थर वाढवत विधानसभेत पोहोचवा ः संजय राऊत

थर वाढवत विधानसभेत पोहोचवा ः संजय राऊत
Published on

थर वाढवत विधानसभेत पोहोचवा! ः संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाण्यातील राजकीय वातावरणाचा पारा चढला असतानाच शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना आज विधानसभेच्या निवडणुकीचे लक्ष्य दिले. दहीहंडीचे थर जसे उंचावत जातात त्याचप्रमाणे ठाण्यात संघटनेचे थर वाढवत विधानसभेत पोहोचायचे आहे, असे आवाहन राऊत यांनी शनिवारी केले. ठाणे शहर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेचेच असल्याचा दावाही त्यांनी केला.
जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला राऊत यांनी भेट देत गोविंदांचा उत्साह वाढवला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी थेट राजकीय भाष्य केले. दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक एकत्र आल्याचे पाहून राऊत यांनी ठाण्यातील वातावरणाचे कौतुक केले. ठाण्यातील उत्सवाचे हे चित्र अत्यंत सुंदर असून, एवढे उत्साहाचे वातावरण आपण मुंबईतही पाहिले नसल्याचे त्यांनी सांगितले. या उत्सवाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ठाण्यातील आगामी राजकीय लढाईचे संकेत देत शिवसैनिकांना संघटनात्मक ताकद वाढविण्याचे आवाहन केले. ‘थरावर थर चढवत जशी दहीहंडी फोडली जाते त्याचप्रमाणे ठाण्यात संघटनेचे थर वाढवत विधानसभेपर्यंत पोहोचायचे आहे,’ असा संदेश त्यांनी दिला. ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख करीत ठाण्यावरील शिवसेनेच्या दाव्याची राजकीय पुनरावृत्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com