

गरजवंत इसमास मिळाले जीवदान नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे आले धावून
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) ः सायन-पनवेल महामार्ग, सानपाडा उड्डाणपुलाखाली एक बेघर इसम, वय अंदाजे ६० वर्षे, अत्यंत दयनीय अवस्थेत व अंगावर जखमा झालेल्या परिस्थितीत असल्याची माहिती सानपाडा पोलिस ठाण्याकडून सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांना संपर्क साधून देण्यात आली. कचरे हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करत आहेत. वृद्ध तसेच बेघरांच्या मदतीला ते धावून जात असतात.
सानपाडा पोलिसांनी केलेल्या फोनने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कचरे यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. या वेळी जीवन आनंद संस्था,अध्यक्ष संदीप परब यांच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. गोविंद मार्गी, संपदा सुर्वे आणि भूषण मार्गी यांनी त्या वृद्धाची काळजी घेतली. जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावर अपघातग्रस्त अवस्थेत आढळणारे अज्ञात, बेघर व निराधार नागरिक यांची सातत्याने रुग्णसेवा केली जाते. जखमांचे ड्रेसिंग, कपडे उपलब्ध करून देणे, औषधोपचार तसेच आवश्यक उपचारांसाठी मदत करून त्यांची काळजी घेतली जाते.
सदर इसमाची प्रकृती लक्षात घेता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी कचरे यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र एक रुग्णवाहिका मेंटेनन्ससाठी बंद असून, दुसरी रुग्णसेवेत असल्याचे सांगण्यात आले. जवळपास २० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध न होणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याचे कचरे यांनी सांगितले.
> “आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना ‘रुग्णवाहिका उपलब्ध नाही’ असे ऐकावे लागू नये, यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करणे, आवश्यक संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे आणि पर्यायी बॅकअप व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. १०८ रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. हा पाठपुरावा यशस्वी होऊन नवी मुंबईकरांना आपत्कालीन वेळी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, हीच अपेक्षा. तसेच नवी मुंबईतील बेघर व निराधार नागरिकांसाठी निवारा, आरोग्यसेवा आणि तातडीच्या उपचारांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.”
- नीलेश कचरे, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.