

स्मार्ट सिटीतील दिशादर्शक फलक ‘बिनकामाचे’
नागरिकांच्या करातून उभारलेल्या फलकांकडे महापालिकेचे दुर्लक्ष
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील नागरिकांना विविध सुविधा व निवासी सोसायट्यांचे मार्ग सहज शोधता यावेत, यासाठी पालिकेच्या माध्यमातून चौकाचौकांत आणि प्रमुख रस्त्यांवर दिशादर्शक व नामनिर्देशित फलक उभारण्यात आले आहेत, मात्र देखभालीअभावी या फलकांची दुरवस्था झाली असून, शहराच्या नियोजनबद्ध प्रतिमेलाच धक्का बसत आहे.
शहरातील अनेक भागांत दिशादर्शक फलक कोसळून पडलेले दिसत आहेत. काही ठिकाणी फलक उभारण्यासाठी बसविण्यात आलेले लोखंडी खांब जीर्ण झाल्याने धोकादायक पद्धतीने झुकले आहेत. तर काही ठिकाणी खांब सुस्थितीत उभे असले तरी त्यावरील नामफलकच गायब झाल्याचे चित्र आहे. परिणामी, नव्याने येणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना संबंधित परिसरातील रस्ते, सोसायट्या अथवा महत्त्वाची ठिकाणे शोधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईतील दिशादर्शक फलकांची सद्यःस्थिती पाहता महापालिकेने शहरभर सर्वेक्षण करून जीर्ण व धोकादायक फलक तातडीने हटवावेत. तुटलेले किंवा खाली पडलेले फलक चोरीला जाण्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करून पुन्हा योग्य ठिकाणी बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अपघाताचा धोका
जीर्ण झालेले खांब आणि अर्धवट अवस्थेतील फलक केवळ दिशादर्शनासाठी निरुपयोगी ठरत नसून, ते अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्त्यालगत झुकलेले खांब कधीही वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ फलकांच्या सौंदर्याकडे न पाहता त्यांच्या सुरक्षिततेकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.