

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर महापालिकेतील कचरा व्यवस्थापन ठेकेदार अँथनी वेस्टर्न हँडलिंग कंपनीला १५ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर गुरुवारी झालेल्या महासभेत जोरदार खडाजंगी झाली. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना ठेकेदाराला एवढी मोठी रक्कम देणे योग्य आहे का, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.
नगरसेवक सुमित पाटील आणि ॲड. वैभव भोईर यांनी संबंधित रक्कम देण्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनच वसुली करावी, जनतेचा पैसा खर्च करू नये, अशी मागणी केली. संतोष शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयात अनुभवी वकिलांचा सल्ला घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करता येईल का, याची कायदेशीर शक्यता तपासण्याची मागणी केली. विलास आर. पाटील यांनी प्रशासनाने रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्याऐवजी पुढील कायदेशीर मार्गावर चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आयुक्त अनमोल सागर यांनी सभागृहाच्या मान्यतेने निर्णय घेणे बंधनकारक असल्याने हा विषय महासभेसमोर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले. अखेर महापौर नारायण चौधरी यांनी १५ कोटी रुपये राखीव ठेवून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील प्रक्रिया निश्चित करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, निलेश चौधरी यांनी कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडून दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल केला.
मालमत्ता करवसुलीवरही चर्चा
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यात यावी. करवसुलीत हलगर्जी किंवा गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. करमूल्यांकन उपायुक्तांनी शहरात भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू असून वाढीव बांधकामे आणि अद्याप कर आकारणी न झालेल्या मालमत्तांचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली.
शिक्षण व्यवस्थेतील गटबाजीवर चिंता
उपमहापौर तारीक मोमिन यांनी नगरसेवकांच्या रांगेत बसून महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा खालावत असून शिक्षकांमध्ये गटबाजी वाढली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक कमलाकर पाटील यांनी नगरसेवक आणि अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करून महापालिका शाळांची तपासणी करण्याची मागणी केली. त्यावर महापौर चौधरी यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.