

शिक्षकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी ‘नवदृष्टी’ उपक्रमातून मार्गदर्शन
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम
पनवेल, ता. ६ (बातमीदार) : शिक्षकांच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्यांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे असल्याने शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि महाराष्ट्र होमिओपॅथिक फिमेल डॉक्टर्स असोसिएशन (एमएचएफडीए) पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवदृष्टी-सर्वांगीण आरोग्याचा नवा दृष्टिकोन’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
एमएचएफडीएच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. रुपाली गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शिक्षकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनिक संतुलन आणि दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिमा म्हात्रे यांनी शारीरिक आजार आणि मानसिक-भावनिक स्थिती यांच्यातील परस्परसंबंधावर मार्गदर्शन केले. आजारांकडे पाहण्याचा होमिओपॅथिक उपचारपद्धतीचा दृष्टिकोनही त्यांनी स्पष्ट केला.
एमएचएफडीए पनवेल शाखेच्या अध्यक्षा तथा मानसशास्त्रज्ञ डॉ. सोनाली जोशी यांनी मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्य या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. उपाध्यक्षा डॉ. सोनल शेठ यांनी संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. सोनाली जोशी, डॉ. सोनल शेठ आणि सचिव डॉ. अशिता नांदगावकर यांचे नेतृत्व लाभले. कोअर समितीच्या सदस्यांसह डॉ. अक्षया ठाकूर, डॉ. सुलक्षणा माडे, डॉ. प्राजक्ता वायाळ आणि डॉ. अश्विनी कोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. एमएचएफडीए ‘नवदृष्टी’च्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. वैद्यकीय ज्ञानाला सामाजिक बांधिलकीची जोड देऊन सुरू असलेले त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
- प्रीतम म्हात्रे, अध्यक्ष, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.