विशेष’ विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान!

विशेष’ विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान!
Published on

‘विशेष’ विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान!
संकल्प संस्थेचा उपक्रम; खारघर येथील ‘निपिड’च्या प्रादेशिक केंद्रातील शिक्षकांचा गौरव
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे केवळ अभ्यासक्रम शिकवणे नसून, त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वावलंबनाची दिशा देणे होय. बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या खारघर येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थे (निपिड)च्या प्रादेशिक केंद्रातील शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. ४) गौरव करण्यात आला.
संस्थेच्या संस्थापिका वैशाली जगदाळे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून विशेष शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि त्यांच्या कलागुणांचा विचार करून अध्यापन करतात, मात्र दिव्यांगांबाबतीत प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत, गती आणि क्षमता वेगळी असते. त्यामुळे त्यांना शिकविताना विशेष कौशल्याबरोबरच संयम, सातत्य आणि संवेदनशीलतेची आवश्यकता असते. प्रादेशिक केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच दैनंदिन जीवनातील कौशल्ये, व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे नेण्याचे प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देत त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यावरही भर दिला जातो. अनेक विद्यार्थ्यांनी या प्रयत्नांमधून आत्मविश्वास मिळवत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची वाट धरली आहे.

या शिक्षकांचा झाला सन्मान
कार्यक्रमात महादेव माने (विशेष शिक्षण), गायत्री कावडे (विशेष शिक्षिका), सुरेश बेडके (व्यावसायिक प्रशिक्षक), नमिता राणानवरे (व्यावसायिक प्रशिक्षिका), स्मिता नीलकंठ (विशेष शिक्षिका), संतोष शेलार (विशेष शिक्षक), डॉ. रवी सिंह (प्रभारी अधिकारी) आणि कविता रंगा (पुनर्वसन अधिकारी) यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com