

गणरायाला कलाकुसरीचा साज
५० वर्षांची परंपरा जपत मूर्तिकार संतोष सुतार यांची कलासाधना
माणगाव, ता. ६ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना, श्री क्षेत्र नाते गावातील श्री सोमजाई कला केंद्रात गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू आहे. गेल्या ५० वर्षांपासून सुतार कुटुंबीय गणपती व देवीच्या मूर्ती घडविण्याचा वडिलोपार्जित वारसा जपत आहेत. याच परंपरेला पुढे नेत मूर्तिकार संतोष बबन सुतार यांनी आपल्या कलेतून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
संतोष सुतार जन्मजात पायाने अपंग असूनही शारीरिक अडचणींना न जुमानता ते मूर्तिकलेची साधना करीत आहेत. मेहनत, चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर ते आकर्षक गणेश व देवीच्या मूर्ती साकारत आहेत. मूर्ती घडविताना गणरायाच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची ठेवण, मुकुटाची नक्षी, अलंकार आणि इतर बारकावे ते अत्यंत कौशल्याने पूर्ण करतात. त्यामुळे त्यांच्या मूर्तींना भाविकांकडून पसंती मिळत आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने सध्या मूर्तींना रंगरंगोटी व कलाकुसरीचा अंतिम साज देण्याचे काम वेगाने सुरू आहे. मातीला आकार देताना त्यांच्या हातांच्या कौशल्यासोबत श्रद्धा, कल्पकता आणि सौंदर्यदृष्टीचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पारंपरिक कला जपत त्यांनी नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
अपंगत्वावर इच्छाशक्तीची मात
शारीरिक मर्यादा ही कलेच्या आड येत नाही, हे संतोष सुतार यांच्या कार्यातून स्पष्ट होते. जन्मजात पायाने अपंगत्व असूनही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता मूर्तिकलेला आपले जीवनकार्य बनविले. सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि कलागुणांच्या बळावर त्यांनी या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. पारंपरिक मूर्तिकलेचा वारसा जपतानाच शारीरिक अडचणींवर मात करून स्वावलंबनाचा मार्गही त्यांनी दाखवून दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.