

अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : ढोल-ताशांचा कडकडाट... डीजेच्या तालावर थिरकणारे गोविंदा... ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने दुमदुमलेले रस्ते... आणि दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचणाऱ्या गोविंदा पथकांची रंगलेली चुरस! अशा उत्साह, उन्माद आणि जल्लोषाच्या वातावरणात अंबरनाथमध्ये यंदाचा दहीहंडी उत्सव रंगला. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या दहीहंड्यांसह विविध मंडळांनी आयोजित केलेल्या हंड्यांमुळे अंबरनाथ अक्षरशः गोविंदा जल्लोषात न्हाऊन निघाले.
अंबरनाथ पूर्वेतील वेल्फेअर सेंटर चौकात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकारातून ‘संसदत्न दहीहंडी उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पाच लाख ६७ हजार ५६७ रुपयांच्या रोख पारितोषिकांची लयलूट झाली. विजेत्या पथकासाठी एक लाख ९९ हजार ९९९ रुपयांचे प्रथम पारितोषिक, अंबरनाथकरांसाठी मानाची हंडी ५१ हजार रुपये, तर महिलांसाठी विशेष दहीहंडीचे २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौकात शिवसेना शाखेच्या वतीने शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकारातून मानाची दहीहंडी साजरी झाली. विजेत्या गोविंदा पथकाला एक लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या वतीने महिलांसाठी खास दहीहंडीचे आयोजन केले होते. लावणीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही येथे पाहायला मिळाली. तर भाजपच्या वतीने गावदेवी चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच विविध गोविंदा पथके शहरात दाखल होत असून, ठिकठिकाणी सलामी देत वातावरणात रंग भरत आहेत. ढोल-ताशांचा निनाद, डीजेचा दणदणाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरातील उत्साहाला उधाण आले आहे.
पावसाच्या सरी कोसळत असतानाही गोविंदांचा जोश मात्र तसूभरही कमी झालेला दिसला नाही. डोक्यावर हंडी आणि नजरा बक्षिसावर ठेवत गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे उभारण्याची रंगलेली शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली. बालगोपालांपासून महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.