

‘क्लस्टर’ शब्द मीच आणला ः नाईक
शिंदेंच्या वक्तव्यावर गणेश नाईकांचा पलटवार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : नवी मुंबईतील क्लस्टर विकास योजनेवरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते, वनमंत्री गणेश नाईक यांच्यात जोरदार राजकीय वाक्-युद्ध रंगले आहे. ‘नवी मुंबईत क्लस्टर होणारच, क्लस्टरचा जन्मदाता मी आहे आणि गरिबांना वन बीएचके घरे देणार,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी (ता. ५) केले होते. या वक्तव्याला उत्तर देताना ‘नवी मुंबईत ‘रीडेव्हलपमेंट’ आणि ‘क्लस्टर’ हे शब्दच गणेश नाईकने आणले,’ असा दावा करीत आमदार नाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे.
नवी मुंबईतील कार्यक्रमात गणेश नाईक म्हणाले, ‘नवी मुंबईत रीडेव्हलपमेंट (पुनर्विकास) हा शब्द आणि ‘क्लस्टर’ हा शब्द मीच सर्वप्रथम आणला; परंतु आमच्या मनात असा स्वार्थी क्लस्टर नव्हता, तर आमचा उद्देश शुद्ध होता.’ त्यांनी वाशीतील ‘गणेश टॉवर’चे उदाहरण देत सांगितले, ‘१.५ एफएसआयमध्ये तब्बल ३०० कुटुंबांना मोठी व हक्काची घरे मिळवून दिली होती. जर सरकार अशाच प्रकारे जनतेच्या भल्याचे धोरण राबवणार असेल, तर आम्ही नक्कीच कौतुक करू.’
क्लस्टर विकासाच्या नावाखाली नवी मुंबई शहरावर अवाजवी लोकसंख्येचा भार लादला जात असल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला. ‘नवी मुंबईकरांच्या बोकांडी भरमसाट लोकसंख्या आणून सोडणार असाल आणि शहरात पाण्याचे नियोजन, आरोग्य सुविधा आणि शिक्षणाची योग्य व्यवस्था होणार नसेल, तर अशी परिस्थिती गणेश नाईक होऊ देणार नाही,’ असा सडेतोड इशारा त्यांनी दिला.
----------------------
टोकाची लढाई लढण्यास तयार
‘शहरातील पायाभूत सुविधांचा बळी देऊन जर क्लस्टर योजना लादण्याचा प्रयत्न झाला, तर नवी मुंबईकरांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी आपण टोकाची लढाई लढण्यास तयार आहोत,’ असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘क्लस्टर विकास’ हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून क्लस्टरचा धडाका लावला असताना, मित्रपक्ष असलेल्या भाजपचेच स्थानिक नेते गणेश नाईक यांनी घेतलेली आक्रमक भूमिका नवी मुंबईच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.