विक्रमी तपासण्या; मलेरिया नियंत्रणाचे आव्हान कायम

विक्रमी तपासण्या; मलेरिया नियंत्रणाचे आव्हान कायम
Published on

विक्रमी तपासण्या; मलेरिया नियंत्रणाचे आव्हान कायम
२०२५ मध्ये १८.८९ लाख नमुन्यांची तपासणी; १० हजारांहून अधिक जणांना लागण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील मलेरिया नियंत्रणाबाबत मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांदरम्यान समोर आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. मलेरियाच्या प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक असलेला वार्षिक रक्त तपासणी दर (एबीईआर) गेल्या सुमारे दशकभरात निर्धारित १२ टक्क्यांच्या पातळीपर्यंत पोहोचलेला नव्हता. मात्र, २०२५ मध्ये पालिकेने मलेरियाच्या तपासण्यांचा विस्तार करीत प्रथमच एबीईआर १४.५ टक्क्यांवर नेला.
तपासण्यांचे प्रमाण वाढवल्यानंतरही मलेरियाचा वार्षिक संक्रमण सूचकांक (एपीआय) वाढतच राहिला. २०२२ मध्ये ०.३ असलेला एपीआय २०२३ मध्ये ०.५, २०२४ मध्ये ०.६ आणि २०२५ मध्ये वाढून ०.८ झाला. त्यामुळे केवळ तपासण्यांचे प्रमाण वाढवून मुंबईतील मलेरिया नियंत्रणाचे उद्दिष्ट साध्य होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०२५ मध्ये पालिकेने मलेरिया तपासण्यांमध्ये मोठी वाढ केली. वर्षभरात तब्बल १८ लाख ८९ हजार ०१२ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. २०२४ च्या तुलनेत ही संख्या सुमारे ३.७२ लाखांनी अधिक आहे. त्यामुळे एबीईआरमध्येही मोठी वाढ झाली आणि तो प्रथमच १४.५ टक्क्यांवर पोहोचला. म्हणजेच मलेरियासाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येच्या तपासणीच्या निर्धारित पातळीपेक्षा हा दर लक्षणीयरीत्या अधिक झाला.
तज्ज्ञांच्या मते, मलेरिया नियंत्रणासाठी केवळ तपासण्यांचे प्रमाण वाढवणे पुरेसे नाही. त्यासोबत डासांची प्रभावी उत्पत्तीस्थळे नष्ट करणे, संक्रमित रुग्णांची वेळेत ओळख व उपचार तसेच मलेरियाच्या प्रसाराच्या स्रोतांवर तातडीने आणि प्रभावीपणे कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढलेल्या तपासण्यांचे रूपांतर प्रत्यक्षात मलेरिया नियंत्रणात कितपत होते, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

२०२५ मध्ये विक्रमी तपासण्या
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये १४ लाख २८ हजार २६५ रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली होती आणि एबीईआर ११.३ टक्के होता. २०१६ मध्ये हा दर १२.१ टक्क्यांवर पोहोचला. मात्र त्यानंतर अनेक वर्षे एबीईआर निर्धारित १२ टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी राहिला. २०२४ मध्ये १५ लाख १६ हजार ६५५ रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी एबीईआर ११.७ टक्के होता.

आव्हान कायम
२०२५ मध्ये १८.८९ लाखांहून अधिक रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० हजार १६३ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. म्हणजेच तपासण्यांचे प्रमाण वाढल्याने अधिक रुग्णांची ओळख पटली असली तरी एपीआयमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ मलेरियाचा प्रसार रोखण्यात अद्याप आव्हान कायम असल्याचे संकेत देते.

२०२६ मध्ये पुन्हा कसोटी
२०२६ मध्ये जूनअखेरपर्यंत सात लाख ६१ हजार ४३९ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन हजार ३९४ नमुने मलेरियासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता पालिकेसमोर दुहेरी आव्हान आहे. २०२५ मध्ये गाठलेला १४.५ टक्के एबीईआर कायम ठेवण्याबरोबरच एपीआय कमी करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com