शहापुरात रुग्णांची परवड

शहापुरात रुग्णांची परवड
Published on

शहापूर, ता. ७ (वार्ताहर) : शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवा तीन आठवड्यांपासून बंद असल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे. यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत असून, देखभाल करणाऱ्या कंपनीची देय रक्कम थकीत असल्याने दुरुस्तीचे कामही रखडल्याची माहिती आहे. अत्यावश्यक सेवा बंद असतानाही रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी लागत आहे.
शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकसंख्या आहे. दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात. डोक्याला मार लागणे, पक्षाघाताचा झटका, गंभीर दुखापत किंवा अंतर्गत रक्तस्राव यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत सीटी स्कॅन तपासणी तातडीने होणे आवश्यक असते. यासाठी राज्य सरकारने शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवेचे कंत्राट कृष्णा डायग्नोस्टिक कंपनीला दिले आहे. मात्र, कंपनीची देय रक्कम थकीत असल्याने यंत्रणेच्या देखभालीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. तीन आठवड्यापासून तांत्रिक बिघाडामुळे यंत्रणा बंद असून, ती पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजेंद्रसिंग पवार यांनी सांगितले.

खासगी केंद्रांचा आर्थिक भुर्दंड
रुग्णालयातील यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना खासगी निदान केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे तपासणीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे. सीटी स्कॅन सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी आणि तोपर्यंत रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com