एनसीएमसी कार्डसाठी हेलपाटे

एनसीएमसी कार्डसाठी हेलपाटे
Published on

मुरबाड, ता. ७ (बातमीदार) : एसटी बसने प्रवास करताना सरकारने जाहीर केलेली प्रवास भाड्यातील सवलत मिळवण्यासाठी एनसीएमसी कार्ड घेणे बंधनकारक केले आहे. मुरबाड आगारात हे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध असली, तरी ग्रामीण भागातील प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी; त्यानंतर तयार झालेले कार्ड घेण्यासाठी असे दोनदा मुरबाडला यावे लागते. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने तालुक्यातील सरळगाव, धसई, टोकावडे आणि म्हसा येथे एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मुरबाड तालुक्याचा विस्तीर्ण भाग माळशेज घाटाच्या पायथ्यापर्यंत पसरलेला आहे. वालीवरे, सोनावळे, शेळगाव, थितबी, सावर्णे, जांभुर्डे, पाटगाव पठार आदी दुर्गम भागांतून नागरिकांना विविध कामांसाठी मुरबाडला यावे लागते. वालीवरे ते मुरबाड हे अंतर ५० किलोमीटर असून, ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मोठा खर्च आणि संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. विशेषतः वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना कार्डसाठी दोन वेळा मुरबाडला येणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या प्रवासभाड्यातील सवलतीपासून दुर्गम भागातील अनेक प्रवासी वंचित राहण्याची शक्यता आहे.

आधार कार्डवर सवलतीची मागणी
ग्रामीण भागातील प्रवाशांना सवलतीचा लाभ सहज मिळावा, यासाठी सरळगाव, धसई, टोकावडे आणि म्हसा या प्रमुख ठिकाणी एनसीएमसी कार्ड देण्याची सुविधा सुरू करावी. अथवा दुर्गम भागातील नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणे आधार कार्डच्या आधारे एसटीच्या तिकीट भाड्यात सवलत देण्याची सुविधा कायम ठेवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com