जुईपाड्यात पाण्याची वणवण

जुईपाड्यात पाण्याची वणवण
Published on

जुईपाड्यात पाण्याची वणवण
आठ दिवसांत प्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चाचा इशारा
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) : गोकुळाष्टमीपासून पालिकेकडून पाणीकपात मागे घेण्यात आली असली, तरी जुईपाडा गावातील काही इमारतींमध्ये अद्याप पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. आठ दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास हंडा मोर्चाचा इशारा रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे.
जुईनगर सेक्टर २३ परिसरातील काही सोसायट्यांना दिवसातून केवळ अर्धा ते एक तासच पाणी मिळत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. विशेषतः गावदेवी मंदिराच्या परिसरातील ठकाई निवास, दत्तात्रय निवास, साई माऊली निवास, हिराकुंज निवास आणि काशिनाथ निवास या इमारतींमध्ये पाण्याची तीव्र समस्या असल्याचे महिलांनी सांगितले. पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्याने उपलब्ध पाणी साठवून ठेवण्यासाठी फारच कसरत करावी लागत असल्याचेही रहिवाशांकडून सांगण्यात आले. जुईपाडा गावातील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्त आणि महापौर यांच्या दालनात ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा जुईपाडा गावातील महिलांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधीविरोधात नाराजी
जुईपाडा गाव अ, ब, क की ड यापैकी नेमक्या कोणत्या विभागात येते, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आपल्या परिसरातील पाणीप्रश्नासाठी नेमक्या कोणत्या नगरसेवकाकडे अथवा लोकप्रतिनिधीकडे जाब विचारायचा, हेच स्पष्ट होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

गेल्या मे महिन्यापासून सकाळ आणि संध्याकाळ दोन-दोन तास पाणी येण्याऐवजी केवळ अर्धा ते एक तास पाणी येते. त्यामुळे खूपच त्रास होतो. घरातील कामे आटपून कामावर जाण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे पूर्वीसारखा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा.
- सोनाली सालदुर, स्थानिक महिला

गावातील इमारतीना अधिकृत नळ जोडणी नाही. त्यामुळे अशा अडचणी आल्या तर त्यात पालिका लक्ष घालत नाही. यात नागरिकांचा दोष नसून पालिकेचा आहे. पालिकेने प्रत्येक बिल्डिंगला पाण्याचे मीटर देणे गरजेचे आहे. लोकांनी मागितल्यावर देण्यापेक्षा बिल्डिंग तयार झाली व पाणी वापर चालू झाला की पालिकेने तेथे मीटर देणे गरजेचे असताना तसे न झाल्याने पाण्याचा गैरवापर होण्यास व नागरिकांची पाण्यासाठीची वणवण होण्यास प्रशासन जबाबदार आहे.
- श्रीधर मढवी, स्थानिक नागरिक

शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत असून, कोणत्याही प्रकारची अडचण नाही, मात्र स्थानिक पातळीवर काही तांत्रिक अडचण असल्यास त्याची माहिती घेऊन पाणीपुरवठा नियमित केला जाईल.
- शंकर जाधव, कार्यकारी अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com