

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी झुंबड
पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला वाढती पसंती
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) ः गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुख्य बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी विविध प्रकारचे हार, तोरणे, भरजरी वस्त्रे, फुलांची आरास, तसेच विद्युत रोषणाईच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा विशेषतः प्लॅस्टिक आणि थर्माकोलऐवजी पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाशी, नेरूळ, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, पनवेल आदी भागांतील बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंची दुकाने विविध रंगांच्या साहित्याने सजली आहेत. आकर्षक हार, फुलांचे तोरण, रंगीबेरंगी पडदे, कापडी व कागदी सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. प्लॅस्टिक आणि थर्माकोलवरील निर्बंधांमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे कापडी तसेच कागदी फुलांच्या सजावटीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. थर्माकोलचा वापर कमी करून कागदी, कापडी, जाड पुठ्ठा तसेच लाकडी साहित्याचा वापर वाढला आहे. विविध प्रकारच्या लाकडी वस्तू, फुलांच्या माळा, आकर्षक सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत, तर गणपतीची प्रतिष्ठापना आणि सजावटीसाठी फुलांची आरास करण्याकडेही नागरिकांचा कल कायम आहे. गणपतीच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे आभूषण, अलंकार आणि इमिटेशन ज्वेलरीची मागणी वाढली आहे. सजावटीला आकर्षक रूप देण्यासाठी विद्युत तोरणे, झुंबर, छत्री आदी साहित्याबरोबरच स्मार्ट लाइट आणि कर्टन लाइट्सची मागणी वाढली आहे.
महागाईची झळ पूजा साहित्यास
गणेशपूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत, मात्र यंदा महागाईची झळ पूजासाहित्यालाही बसली असून, मागील वर्षाच्या तुलनेत सर्वसाधारण पूजासाहित्याच्या किमतीत सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे गोल्ड प्लेटेड दिवे, रंगीत माळा, गणपती-गौरींचे मुकुट आणि आरतीचे तबक यांसारख्या डिझायनर वस्तूंच्या किमती ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
उत्पादन खर्च वाढला
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या साहित्याच्या किमतीत यंदा साधारण १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा माल, वाहतूक तसेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे काही वस्तूंच्या किमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे, मात्र गणेशोत्सवाचा उत्साह लक्षात घेता ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.