

मीटर बंद, भाडे ठरलेले!
नेरूळमध्ये रिक्षाचालकांची मनमानी
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) : नेरूळ पश्चिम परिसरात मीटर बंद ठेवून ठरावीक भाडे आकारत प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांची मनमानी वाढल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. नेरूळ गाव, बांचोली मैदान तसेच चांगा-कान्हा ठाकूर रिक्षा स्टँड परिसरात हा प्रकार नियमितपणे अनुभवास येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेरूळ पश्चिम परिसरात अनेकदा प्रवासी गाडीत बसल्यानंतर ठरावीक रक्कम सांगितली जाते. मीटरबाबत विचारणा केली असता उद्धट उत्तरे काही रिक्षाचालकांकडून दिले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. परिसराची माहिती असलेल्या प्रवाशांना भाड्याचा अंदाज असतो; मात्र नेरूळ परिसरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांची यात मोठी फसवणूक होते. भाड्यावर आक्षेप घेतल्यास काही रिक्षाचालक वाद घालतात. त्यामुळे नियमानुसार मीटरप्रमाणे वाहतूक न करणाऱ्या अशा रिक्षाचालकांवर नेमकी कारवाई कोण करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. परिवहन विभाग आणि स्थानिक वाहतूक विभागाने नेरूळ परिसरातील रिक्षांची तपासणी करून मीटर, परवाने आणि भाडे आकारणीची पद्धत तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अबोली रिक्षामध्ये पुरुष चालक ः महिलांची गैरसोय
नेरूळ परिसरात काही काळापूर्वी महिला प्रवाशांसाठी आधार ठरणाऱ्या अबोली रिक्षांची संख्या ८ ते १० इतकी होती, असे नागरिक सांगतात, मात्र आता दिवसभरात एखादीच अबोली रिक्षा दृष्टीस पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अबोली रिक्षा दिसल्यानंतर काही महिला प्रवासी त्या रिक्षेकडे धाव घेतात, मात्र अनेकदा अबोली रिक्षा महिलांऐवजी पुरुष चालक चालवत असल्याचा अनुभव महिलांना येत असल्याने या सुविधेचा नेमका लाभ कोणाला मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही बांचोली मैदानासमोरील मेडिकल समोरून रिक्षा पकडून डी. वाय. पाटील रुग्णालयात गेले होते. मीटर चालू न करता आमच्याकडे थेट ४० रुपयांची मागणी करण्यात आली. रिक्षाचालक जवळपास ६० वयाचे असल्याने आम्ही त्यांच्याशी वाद घातला नाही, मात्र आम्ही पुन्हा उलट दिशेने त्याच ठिकाणी आल्यावर भाडे ३६ रुपये झाले. त्यामुळे अधिक भाडे आकारल्याचा प्रकार आमच्या बाबतीत घडला.
- वैशाली बोथरे, प्रवासी
परिसरात मोठ्या प्रमाणात प्रामाणिक आणि गरजू लोक रिक्षाचालक आहेत, मात्र काही मुळातच अप्रामाणिक रिक्षाचालकांमुळे बाकीचे बदनाम होत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर नक्कीच कठोर करावी झाली पाहिजे.
- दिलीप आमले, रिक्षा चालक-मालक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.