

करंजा बंदराच्या विकासासाठी १८० कोटी
तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून, विविध विकासकामांसाठी १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी करंजा सोसायटी येथे रविवारी (ता. ६) बैठक घेण्यात आली. आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मच्छीमार उपस्थित होते.
करंजा परिसराचा मच्छीमारी व्यवसायाशी जवळचा संबंध असल्याने मच्छीमारांच्या दैनंदिन गरजा, व्यवसायातील अडचणी आणि पायाभूत सुविधांचा विचार करून विकासकामांचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीत मच्छीमार व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विविध समस्या, मागण्या आणि सूचना घेण्यात आल्या. स्थानिक नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन विकासकामे करण्यात येतील, असे आमदार बालदी यांनी स्पष्ट केले.
१८० कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित विकासकामांची प्रक्रिया सुरू असून, पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. कामे नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या वेळी जयविंद्र कोळी, नारायण नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, सागर नाखवा, शिवदास कोळी यांच्यासह पदाधिकारी, मच्छीमार आणि अधिकारी उपस्थित होते.
मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
करंजा परिसरातील विकासकामांचे नियोजन करताना मच्छीमारांच्या व्यवसायाशी संबंधित गरजांना प्राधान्य दिले जाणार आहे. मच्छीमारांच्या अडचणी, स्थानिक पायाभूत सुविधांची गरज आणि दैनंदिन व्यवसायासाठी आवश्यक सुविधा याबाबत बैठकीत सूचना घेण्यात आल्या. उपलब्ध होणाऱ्या १८० कोटींच्या निधीतून ही कामे केवळ प्रस्तावापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.