

रद्दी कागदांपासून साकारला पर्यावरणस्नेही गणराय
अडीच ते तीन फुटांची गणेशमूर्ती; घरच्या घरी विसर्जनाचा उपक्रम
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः गणेशोत्सव म्हटले की आकर्षक आणि देखण्या गणेशमूर्तीची ओढ प्रत्येकालाच असते, मात्र उत्सवाचा आनंद घेतानाच पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत विक्रोळी येथील पर्यावरणस्नेही दीपक गभाले यांनी गेल्या सहा वर्षांपासून घरच्या घरी रद्दी कागद आणि नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनोखा उपक्रम सुरू ठेवला आहे.
कोरोना महामारीच्या काळात, ऑगस्ट २०२० मध्ये गभाले कुटुंब होम क्वारंटाईन असताना ही संकल्पना त्यांच्या मनात आली. त्यातूनच २२ ऑगस्ट २०२० रोजी त्यांनी पहिली घरच्या घरी तयार केलेली इको-फ्रेंडली गणेशमूर्ती विराजमान केली. त्यानंतर दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी ‘होममेड, विदाऊट मोल्ड’ पद्धतीने कागदापासून गणेशमूर्ती साकारून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
यंदाची मूर्ती साकारण्यासाठी तब्बल २५ दिवस मेहनत घेण्यात आली. साधारण दोन ते तीन आठवडे लागणाऱ्या या मूर्तीसाठी यंदा केवळ २०० ते २५० ग्रॅम रद्दी कागदासह उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
मूर्तीची उंची अडीच ते तीन फूट असून, विशेष म्हणजे मूर्तीला रासायनिक रंग न देता गुळवेलीची पाने चिकटवून नैसर्गिक स्वरूपाची सजावट करण्यात आली आहे. गणेशमूर्तीचे धोतर आणि शेलाही मक्याच्या कणसाच्या पाष्टांपासून तयार करण्यात आला आहे. मूर्ती तयार करण्यासाठीचा खर्च जवळपास शून्य असून, केवळ सजावटीसाठी सुमारे १७० रुपये खर्च आला आहे. त्यामुळे अवघ्या १७० रुपयांत आकर्षक, पर्यावरणस्नेही आणि प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गभाले कुटुंबीयांचा गणपती पाच दिवसांचा असून, मूर्तीचे विसर्जनही बाहेर न करता घरीच टबमध्ये केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यावरणस्नेही आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपक गभाले यांनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साधनसंपत्तीचा कल्पकतेने वापर करून अत्यल्प खर्चात गणेशमूर्ती साकारली आहे. त्यांच्या या उपक्रमातून ‘भक्तीबरोबरच पर्यावरणाचीही काळजी’ हा महत्त्वपूर्ण संदेश समाजासमोर येत आहे.
पर्यावरणाचं भान राखून केलेला उत्सव हा खरा उत्सव आहे. आजच्या काळात उत्सव कमी आणि इव्हेंट जास्त साजरा होतो आहे. त्यामुळे दरवर्षी आम्ही कागदापासून गणपती साकारत आहोत. घरच्या घरी विसर्जन करून ते पाणी झाडांना घालतो. कमी खर्चात मोठा उत्सव साजरा करता येतो.
– दीपक गभाले, पर्यावरणस्नेही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.