श्रावणी सोमवारला भक्तीसोबत ज्ञानाचा जागर

श्रावणी सोमवारला भक्तीसोबत ज्ञानाचा जागर
Published on

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : देवाच्या चरणी फुले, प्रसाद आणि फळे अर्पण करण्याची परंपरा सर्वश्रुत आहे; मात्र महागिरीतील अमृतेश्वर महादेव मंदिरात यंदा भक्तीला ज्ञानदानाची जोड देत अनोखी ‘ज्ञानाची वाडी’ साकारण्यात आली. वह्या, पेन, पेन्सिल यांसह विविध शैक्षणिक साहित्याने साकारलेल्या या वाडीमध्ये भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. धार्मिक श्रद्धेसोबत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे श्रावणी सोमवारला महागिरीत ‘भक्तीसोबत ज्ञानाचा जागर’ अनुभवायला मिळाला.

सामान्यतः धार्मिक उत्सवांमध्ये फळे, प्रसाद किंवा खाद्यपदार्थांची वाडी भरवली जाते, मात्र विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाची साधने पोहोचवण्यासाठी शैक्षणिक साहित्याची वाडी भरविण्याची संकल्पना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या ज्ञानाच्या वाडीमध्ये वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, ड्रॉइंग कलर पेन्सिल, डमरू यांसह विविध शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला. संकलित करण्यात आलेले हे साहित्य पुढील काळात गरजू आणि शालेय विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे धार्मिक उपक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची जोड देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. समाजसेवक संदेश कवितके यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच ‘ज्ञानाची वाडी’ साकारण्यासाठी पराग घोसाळकर, महेश म्हात्रे, दिलीप पवार, राजू धुमाळ, पल्लवी घोसाळकर आणि प्रगती म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.

‘ज्ञानदाना’ला प्राधान्य
‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ या विचाराला अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळावी, असा संदेश देण्यात आला. अमृतेश्वर महादेव मंदिरात यापूर्वीही श्रावणी सोमवारनिमित्त बिस्कीट, चॉकलेट, पाने आणि फळांची वाडी असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदा मात्र शैक्षणिक साहित्याची वाडी भरवून या उपक्रमाला वेगळे सामाजिक स्वरूप देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com