वयोवृद्धाला तीन लाखांचा गंडा

वयोवृद्धाला तीन लाखांचा गंडा
Published on

ठाणे, ता. ९ : महानगर गॅसचे कर्मचारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी नौपाड्यातील एका ६२ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला ऑनलाइन गंडा घातला. गॅस खाते पुन्हा सुरू करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दोन क्रेडिट कार्डमधून तब्बल तीन लाख आठ हजार २६५ रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ पॅलेस, भास्कर कॉलनी येथे राहणारे संजय फणशीकर यांना मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण महानगर गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगत संबंधिताने फणशीकर यांचे गॅस खाते निष्क्रिय झाले असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी १० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर बिलासारखी दिसणारी एपीके फाइल पाठवून त्याद्वारे शुल्क भरण्यास सांगण्यात आले. फणशीकर यांनी गुगल पेच्या माध्यमातून पैसे भरण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यवहार झाला नाही. त्यानंतर भामट्याने त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर हटविण्यास सांगितले. तसेच, पुन्हा-पुन्हा पैसे भरण्यास प्रवृत्त केले.
दरम्यान, रात्री ८.३१ वाजता बँकेचा संदेश आल्यानंतर फणशीकर यांना त्यांच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख दोन हजार ८५० रुपये वजा झाल्याचे समजले. त्यानंतर रात्री ८.३५ वाजता ९२ हजार ५६५ रुपये, तर ८.५० वाजता पुन्हा एक लाख १२ हजार ८५० रुपये वजा झाले. आपण कोणतीही खरेदी केलेली नसताना एवढी रक्कम वजा झाल्याने ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com