जीवनदूतांचे कार्य अतुलनीय

जीवनदूतांचे कार्य अतुलनीय
Published on

जीवनदूतांचे कार्य अतुलनीय
पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते बचाव पथकांचा गौरव; रस्ता सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले.
रायगड पोलिसांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा सोमवारी (ता. ७) कुरुळ येथील आर.सी.एफ. सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी गोगावले बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिस, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने समन्वयाने काम करावे, असे आवाहन गोगावले यांनी केले. अपघाताच्या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू करता यावे, यासाठी रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही रेस्क्यू पथकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाचीही जबाबदारी आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच मद्यपान करून किंवा अतिवेगाने वाहन चालवू नये. ‘वेगापेक्षा सुरक्षा महत्त्वाची, स्टाईलपेक्षा हेल्मेट महत्त्वाचे आणि घाईपेक्षा जीवन महत्त्वाचे,’ असा संदेश गोगावले यांनी दिला.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगडमध्ये समुद्रकिनारे, डोंगर-दऱ्या, महामार्ग, पर्यटनस्थळे आणि औद्योगिक क्षेत्रे असल्याने विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करावा लागतो, असे सांगितले. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, महामार्गावरील अपघात तसेच औद्योगिक दुर्घटनांच्या वेळी रेस्क्यू पथकांनी धैर्याने काम करून प्रशासनाला मोठी साथ दिल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी रिलायन्स फाउंडेशन, नागोठणे यांच्या सीएसआर निधीतून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला बचाव नौका आणि बचाव साहित्य किट सुपूर्द करण्यात आले.

बचाव पथकांचा सन्मान
या वेळी हेल्प फाउंडेशन, शेलार मामा रेस्क्यू, संघर्ष एक समाज सेवेसाठी, फ्लाइंग बर्ड्स श्रीवर्धन, पोलादपूरचे सह्याद्री वन्यजीव पथक, एलअँडटी कन्स्ट्रक्शन रेस्क्यू टीम, नेरळ-माथेरान रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स, महाड परिसरातील रेस्क्यू पथक तसेच जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com