

सिडकोच्या ४,७९३ घरांसाठी ४,१८० अर्जदारांचे स्वारस्य
ऑगस्टच्या गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : सिडकोने १५ ऑगस्टला जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. याअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या चार हजार ७९३ घरांसाठी एकूण चार हजार १८० अर्जदारांनी आपले स्वारस्य नोंदविले आहे. तळोजा, खारघर आणि कळंबोली या नोड्समध्ये ही घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून, ३ सप्टेंबरला या योजनेच्या बुकिंगची मुदत पूर्ण झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना नवी मुंबईसारख्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण घर मिळावे, या उद्देशाने सिडकोने ही योजना आखली होती. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना - शहरीअंतर्गत २.५ लाखांचे अनुदान उपलब्ध होणार आहे. लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी करणे अधिक सुलभ झाले आहे.
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मिळालेला प्रतिसाद हा नवी मुंबईत स्वतःचे घर असावे, या नागरिकांच्या आकांक्षेचे तसेच सिडकोच्या नियोजित विकासावर असलेल्या त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नागरिकांना नियोजित परिसरात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देतानाच नवी मुंबईतील वाढत्या पायाभूत सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळवून देण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे.
- अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
१० सप्टेंबरला अंतिम यादी; अशी आहे पुढील प्रक्रिया
सिडकोने योजनेतील पारदर्शकता आणि जलद प्रक्रियेसाठी होम्स पोर्टलचा वापर केला आहे. ४ सप्टेंबरला प्रारूप यादी जाहीर केली असून अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप यादीवर काही हरकत किंवा आक्षेप असल्यास अर्जदारांना ८ सप्टेंबरपर्यंत ते नोंदवता येणार आहेत. प्राप्त हरकतींची पडताळणी केल्यानंतर १० सप्टेंबरला पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर संगणकीय सोडतीची (लॉटरी) तारीख व पुढील प्रक्रिया अधिकृत पोर्टलवर घोषित केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.