ड्रग्जमाफिया आणि डीजेवाल्यांचा कडेलोट!

ड्रग्जमाफिया आणि डीजेवाल्यांचा कडेलोट!
Published on

ड्रग्जमाफिया आणि डीजेवाल्यांचा कडेलोट!
आमदार मंदा म्हात्रे आक्रमक; पोलिस आयुक्तांसोबतच्या बैठकीत ‘अल्टिमेटम’
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : शहराला अमली पदार्थांच्या विळख्यातून आणि कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची उघड विक्री, नियमबाह्य डीजेचा धुमाकूळ आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर मंदा म्हात्रे यांनी थेट पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. नवी मुंबईत ड्रग्जमाफिया आणि कायदा मोडणाऱ्यांवर सळो की पळो करून सोडणारी कारवाई झालीच पाहिजे, असा इशारा त्यांनी या बैठकीत दिला.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात फेरफटका मारणाऱ्या ड्रग्जमाफियांवर आणि टपऱ्यांवर तातडीने पोलिसांचा चाबूक चालवण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई न करता यामागील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण सप्लाय चेन उद्ध्वस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ड्रग्ज, सिगारेट, चरस, गांजा आणि हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष टास्क फोर्स मैदानात उतरणार आहे. तरुण पिढीला या विळख्यातून वाचवण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जाळे तयार केले जाईल. विद्यार्थी ११२ या क्रमांकावर आपली ओळख गुप्त ठेवून ड्रग्ज पुरवठादारांची माहिती थेट पोलिसांना देऊ शकतील. आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात तरुणांना लक्ष्य करणाऱ्या अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर आधीच छापे मारून ते उद्ध्वस्त करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. नवी मुंबईतील प्रमुख चौक, अरुंद रस्ते, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवून महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण संरक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, भाजप नेते नीलेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजू शिंदे, पोलिस पाटील दिलीप पाटील, विकास सोरटे, विविध माध्यमांचे पत्रकार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस आयुक्तांनी या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेत तातडीने धडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

डीजेमुक्त नवी मुंबई; वाजवला तर जप्त करून थेट तुरुंगात!
सण-उत्सवाच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि हृदयविकाराच्या रुग्णांना होणाऱ्या त्रासावर मंदा म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात संपूर्ण नवी मुंबई डीजेमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. डीजे पुरवणाऱ्या व्यावसायिकांना आधीच इशारा पत्रक जारी करण्यात आले आहे. ज्या गणेश मंडळांनी डीजेसाठी आगाऊ रक्कम दिली आहे, ती रक्कम डीजे मालकांनी मंडळांना त्वरित परत करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. डीजेच्या विकृत संस्कृतीला फाटा देऊन ढोल-ताशा, तुतारी, पिपाणी आणि लेझीम या आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचा गजर करत उत्सव साजरा करण्याचे आवाहन आमदार म्हात्रे यांनी केले.

मानसिक ताणावर उपाययोजना करा!
सततच्या दीर्घ ड्युटीचे तास, अपुरी विश्रांती आणि वाढत्या ताणतणावामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या आत्महत्येच्या घटनांवर मंदा म्हात्रे यांनी चिंता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नियमित समुपदेशन आणि मानसिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याची मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

नवी मुंबईला सुरक्षित, नशामुक्त आणि गुन्हेगारीमुक्त करणे ही आमची कटिबद्धता आहे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या दलदलीत ढकलू देणार नाही. पोलिस प्रशासनाने तात्काळ आणि दृश्य स्वरूपात कारवाई करून दाखवावी अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू.
- मंदा म्हात्रे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com