गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!

गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!
Published on

गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!
डिजीम्हाडा ॲपवर म्हाडाच्या डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : म्हाडाच्या वसाहतींमध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला, सामाजिक बांधिलकीला आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने ‘म्हाडा डिजिटल गणेशोत्सव २०२६ अंतर्गत गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ‘डिजीम्हाडा’ ॲपवर गो-लाइव्ह करून स्‍पर्धेला प्रारंभ करण्यात आला.
म्हाडाच्या राज्यभरातील विविध मंडळांच्या अभिन्यासांमध्ये तसेच म्हाडा वसाहतींमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्तरावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवातील वैविध्यपूर्ण संकल्पना, आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणपूरक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळे तसेच वैयक्तिक पातळीवर गणेशोत्सव साजरा करणारे म्हाडा रहिवासी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धकांना ‘डिजीम्हाडा’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करून आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये सादर करता येणार आहेत.
नोंदणीच्या वेळी स्पर्धकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित म्हाडा वसाहत अथवा अभिन्यासाचे नाव आणि गणेशोत्सवाचा प्रकार यासंबंधीची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर गणेशमूर्ती, सजावट आणि गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये दर्शविणारी छायाचित्रे तसेच कमाल दोन मिनिटांचा व्हिडिओ ॲपवर अपलोड करता येणार आहे.
या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात येणार असून, परीक्षण करताना नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर, पर्यावरणपूरक सजावट, जलसंवर्धन, निर्माल्य व्यवस्थापन, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न तसेच सामाजिक व जनजागृतीपर संदेश देणाऱ्या सजावटीचा विचार केला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांची निवड सर्वाधिक मिळालेल्या मतांच्या आधारे केली जाईल. तसेच स्पर्धेतील विविध विभागांमधून उत्कृष्ट गणेशोत्सवांची निवड करून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुंबईत दोन स्वतंत्र विभाग
गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन म्हाडाच्या राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार जिल्हानिहाय करण्यात येणार आहे. मुंबई विभागाचे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील म्हाडा परिवाराला आपल्या गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना, सजावट आणि सामाजिक उपक्रम महाराष्ट्रासमोर डिजिटल माध्यमातून मांडण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com