

उन्नत मार्गासाठी पुन्हा झाडांवर कुऱ्हाड
घाटकोपर-विक्रोळीतील ५० गुलाबी ट्रम्पेट वृक्ष रातोरात तोडले; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः घाटकोपर ते ठाणे या नव्याने होऊ घातलेल्या पूर्व मुक्त मार्गाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर-विक्रोळी यादरम्यानच्या महामार्गाच्या दक्षिणेकडील सर्व्हिस रोडवरील जवळपास ५० हिरवीगार झाडे रातोरात तोडून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, येथील कत्तल केलेली ही झाडे ‘पिंक ट्रम्पेट’ या प्रकारातील होती. यापूर्वी ती तोडण्याबाबत पालिका आणि एमएमआरडीए प्राधिकरणाने मंजुरी दिली होती, मात्र पर्यावरणप्रेमींनी त्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे एमएमआरडीए प्राधिकरणाने उन्नत रस्त्याच्या रचनेत बदल केला होता. त्यानंतर घाटकोपर-विक्रोळी दरम्यानची १२७ गुलाबी ट्रम्पेेटची झाडे वाचवली होती, मात्र आता रात्रीच्या अंधारात या झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे, असा आरोप केला जात आहे.
ही झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या संबंधित प्राधिकरणाची परवानगी असून, त्यानंतरच ही झाडे तोडली आहेत, असे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी सांगितले. ही झाडे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बहरत असतात. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या ठिकाणी येऊन झाडे तोडण्यास विरोध केला होता. तरीही आता ही झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ‘‘आता आपण या झाडांना नाहीसे होताना बघत बसायचे. अनेक वर्षांपासून येथून धावणाऱ्या आणि चालणारांची सोबत करणारी ही झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी फक्त बुंधे, फांद्या आणि पानांचा पसारा दिसत आहे. लवकरच त्यांचीही स्वच्छता होऊन नवीन उभ्या झाडांकडे सरकारची वक्र दृष्टी पडेल.’’ अशा भावना याबाबत बोलताना पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.
असा जातोय झाडांचा बळी
घाटकोपर-ठाणे दरम्यानच्या पूर्व मुक्त मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर ते कांजूरमार्ग भागातील झाडे काढली जात आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या प्रकल्पासाठी झाडे काढण्यास मंजुरी दिली आहे. महामार्गावरील एकूण एक हजार ६५५ झाडांपैकी ७०६ झाडे या प्रकल्पाच्या कामामुळे बाधित होत आहेत. सुमारे ३२० झाडे तोडली जाणार आहेत. उर्वरित ३८६ झाडे सुरक्षितपणे उपटून इतर ठिकाणी पुनर्रोपित केली जात आहेत, तर महामार्गावरील ९४९ झाडे सुरक्षितपणे जतन केली आहेत. घाटकोपर-विक्रोळीतील गुलाबी सडा असलेली ही झाडे आता तोडली जात आहेत.
येथील झाडे यापूर्वी तोडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आम्ही पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. तरीही विकासकामाच्या नावाखाली या झाडांचा अखेर बळी दिला आहे. आता येथे नवीन झाडे लावली तरीही भविष्यात ती मोठी होण्यासाठी १५ ते २० वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे उर्वरित झाडे तोडू नयेत.
- नरेंद्र सावंत, पर्यावरणप्रेमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.