स्कूलबस सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!

स्कूलबस सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!
Published on

चिमुकलीवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये भीती
नियम कागदावरच ः स्कूल बस सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः कामोठे येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालकवर्गात भीती आणि संतापाची लाट उसळली आहे. स्कूल व्हॅन किंवा बसमधील प्रवासात आपले मूल सुरक्षित आहे का, असा गंभीर प्रश्न पालकांना सतावत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन, आरटीओ, शिक्षण विभाग आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संयुक्त व कठोर तपासणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी शैक्षणिक संस्था असून, विविध वसाहती आणि शाळांमधील अंतर लक्षात घेता हजारो विद्यार्थी दररोज स्कूल बस, व्हॅन आणि अन्य वाहनांमधून प्रवास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी केवळ पालकांची किंवा वाहनचालकांची नसून शाळा प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणांचीही आहे. विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात परिवहन विभाग आणि शिक्षण विभागाने विविध सुरक्षा नियम व मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. प्रत्येक स्कूल बसच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, महिला केअरटेकर अथवा अटेंडंट, चालक व बस कर्मचाऱ्यांची योग्य पडताळणी यांसारख्या उपाययोजनांना महत्त्व आहे; मात्र कामोठे येथील घटनेनंतर संबंधित स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्हीची सुविधा नसल्याचे समोर आल्याने विद्यार्थी सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, शाळेच्या नोंदीत महिला सहाय्यक असल्याचे नमूद असताना प्रत्यक्षात चिमुकलीसोबत असा प्रकार घडला कसा, असा सवाल महिला संघटना आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री नोंदी करून जबाबदारी झटकण्याऐवजी प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्था कार्यरत आहे की नाही, याची तपासणी कोण करणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आरटीओ ‘तपासणी’ आता केवळ कागदावर
पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची विशेष मोहीम राबवून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. स्कूल बस आणि व्हॅनची फिटनेस, सीसीटीव्ही, महिला सहाय्यक, चालकांची कागदपत्रे व पोलिस पडताळणी यांसह सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची आवश्यकता आहे. कामोठे येथील घटनेने केवळ एका कुटुंबाला हादरवले नाही, तर संपूर्ण पालकवर्गाला अस्वस्थ केले आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ एका गुन्ह्याच्या चौकटीत न पाहता विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे.

कामोठे वसाहतीमध्ये घडलेली घटना अतिशय वेदनादायी आणि विकृत मानसिकतेतून घडलेली आहे; मात्र विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन आणि शिक्षण विभागाच्या भूमिकेकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. संबंधित बसमध्ये केअरटेकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याची जबाबदारी आरटीओची आहे. मोठमोठी वाहने, टुरिस्ट बस, पासिंग आणि इतर कामांमध्ये व्यस्त असलेल्या पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाने चिमुकल्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले कधी उचलणार, हा आमचा सवाल आहे. या घटनेचा आम्ही निषेध नोंदवला असून यासंदर्भात स्थानिक पोलिसांना पत्रही दिले आहे.
- जयश्री झा-सुद्रिक, संस्थापिका, श्री सखी प्रतिष्ठान

कामोठे येथे घडलेल्या घटनेचा सर्वांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्याची आवश्यकता आहे. असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, यासाठी गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब निर्माण होणे आवश्यक आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आम्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
- सुवर्णा वाळुंज, शिवव्याख्यात्या

Marathi News Esakal
www.esakal.com