

अडथळामुक्त पदपथांसाठी आयुक्त थेट रस्त्यावर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. कैलास शिंदे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागरिकांना अडथळामुक्त पदपथ मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने संपूर्ण शहरभर व्यापक व धडक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी थेट रस्त्यावर उतरुन प्रत्यक्षात सुरू असलेल्या कारवाईची पाहणी केली.
सर्व विभाग कार्यालयांमार्फत सोमवार (ता. ७)पासून अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. यानुसार वाशी येथील सेक्टर ९, १० तसेच नेरूळ येथील सेक्टर २९, ३ आणि ३० मधील मार्जिनल स्पेस (समास अंतर) व पदपथांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचा कैलास शिंदे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. याप्रसंगी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे, परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, तसेच वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुखदेव येडवे आणि नेरूळ विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर उपस्थित होते.
पदपथांवर कोणत्याही प्रकारचा अधिकृत किंवा अनधिकृत अडथळा राहता कामा नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. या मोहीमपूर्व नियोजनासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने विशेष कृती आराखडा तयार केला होता. विभागातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या पदपथांचे सर्वेक्षण करून सर्वाधिक अडथळे असलेल्या भागांची यादी तयार करण्यात आली. अधिकृत फेरीवाल्यांना पदपथ सोडून पर्यायी जागांची व्यवस्था केली जात आहे, तर अनधिकृत फेरीवाले व तात्पुरत्या अतिक्रमणांवर थेट जप्ती व निष्कासनाची धडक कारवाई केली जात आहे. प्रत्येक विभागात स्वतंत्र विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
कारवाईत सातत्य राखणार; अतिक्रमणांना थारा नाही
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही केवळ तात्पुरती किंवा एका दिवसाची मोहीम नसून शहराला कायमस्वरूपी ‘अडथळामुक्त’ ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्व विभाग कार्यालयांकडून सुरू असलेली ही कारवाई पुढेही नियमित सुरू राहील आणि पदपथांवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, या दृष्टीने यात सातत्य राखले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.