

जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा
मृत वकिलाच्या नावाने बनावट स्वाक्षरी व नोटरीचा वापर केल्याचा आरोप
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : रोहिंजण येथील जमीन व्यवहारात बनावट दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी उद्योजक लालजी आरेठिया यांच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुटारी येथील गणू गायकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने आरेठिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
गणू गायकर यांच्या तक्रारीनुसार, रोहिंजण येथील गट क्रमांक ७३/१ मधील १३ हजार ५०० चौ.मी. जमीन त्यांच्या मालकीची असल्याचे महसूल अभिलेखात नमूद आहे. यापैकी पाच हजार चौ.मी. क्षेत्राची विक्री एलोरा हेरिटेजला करण्यात आली असून, उर्वरित आठ हजार ५०० चौ.मी. क्षेत्र विकासासाठी देण्यात आले आहे. गायकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की यापूर्वी त्यांचा वासुदेव घरत यांच्यासोबत साठेकरार झाला होता; मात्र आरेठिया हे त्या व्यवहारात पक्षकार नव्हते. असे असतानाही आरेठिया यांनी गायकर यांच्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा केले आणि २०१२ मध्ये कथित समझोता करारनामा तयार केला. या दस्तऐवजावर आपली स्वाक्षरी नसल्याचे गायकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच २०१८ मध्ये सुधारित समझोता करारनामा तयार करण्यात आला असून, त्यावरील नोटरी नोंदी बनावट असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे पनवेल न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, वासुदेव घरत यांनीही आरेठिया यांच्यावर मृत वकिलाच्या नावाने बनावट स्वाक्षरी व नोटरीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास तळोजा पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.