बाप्पाच्या सजावट साहित्याने बाजारपेठा सजल्या

बाप्पाच्या सजावट साहित्याने बाजारपेठा सजल्या
Published on

बाप्पाच्या सजावट साहित्याने बाजारपेठा सजल्या
फोम शीट, कापडी माळा, मोत्यांचे हार अन् आकर्षक लटकनांना मागणी; महागाईचा फटका

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) ः गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी घरांची सजावट करण्याची तयारी सुरू झाली असून, एपीएमसी आणि तुर्भे येथील जनता मार्केटसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा सजावटीच्या साहित्यामध्येही विविध आकर्षक प्रकार उपलब्ध झाले आहेत. आरास करण्यासाठी फोमच्या कमानी, फोम शीट, विविध रंगांच्या कागदी शीट, गोल्डन पेपर, वेल्वेट पेपर आदी साहित्य बाजारात दाखल झाले आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून फोम शीटचा वापर वाढला असला तरी त्याचे दर तुलनेने अधिक असल्याने अनेक ग्राहक कार्डशीट, कागद आणि कापडी साहित्याला पसंती देत आहेत.

माळा, हार आणि लटकनांना पसंती
बाजारात गोल मण्यांच्या माळा, मोत्यांचे हार, चंदन माळ, गोंड्याच्या माळा, कापडी व कागदी फुलांच्या माळा, विविध प्रकारची लटकन तसेच विद्युत माळा आकर्षण ठरत आहेत. मखराभोवती सुशोभीकरणासाठी पानाफुलांच्या माळा, कमानी, बुके, झालर आणि आकर्षक पडदे उपलब्ध आहेत. कागदी क्रेप, मणी, काचेच्या नळ्या, शंख-शिंपले, कुंदन व खड्यांपासून तयार केलेल्या माळांनाही ग्राहकांकडून मागणी आहे.
खड्यांच्या कंठ्या, मुकुट, रुद्राक्षाच्या माळा तसेच प्लॅस्टिकच्या जास्वंदीच्या फुलांचे हारही बाजारात विक्रीसाठी आले आहेत. तयार मखरांसोबत घरच्या घरी आरास करण्यासाठी आवश्यक साहित्य स्वतंत्रपणे खरेदी करण्याकडेही भाविकांचा कल आहे.

साहित्याचे दर
सजावटीचे साहित्य अंदाजे दर
चंदन माळ ५० ते १,३०० रुपये
कापडी माळ ८० ते १,५०० रुपये
गोंड्याची माळ १५० ते १,२०० रुपये
मोत्यांचे हार २०० ते १,५०० रुपये
लटकन २५० ते १,००० रुपये
रुद्राक्षांची माळ ५० ते २५० रुपये
वस्त्र ५० रुपयांपासून पुढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com