रुग्णालयात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही

रुग्णालयात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही
Published on

हलगर्जी थांबवण्यासाठी एसओपी कडक बंधन!
रुग्णालयात निष्काळजी खपवून घेणार नाही ः आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ : पालिका रुग्णालयातील दुर्घटनांनंतर आरोग्य विभागाला अखेर जाग आली आहे. गर्भवती मृत्यू प्रकरण, पिण्याच्या पाण्यात उंदीर, मुदतबाह्य सलाईन देणे आदी घटनांवरून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरत कारवाईचा इशारा दिला आहे. तर आरोग्य विभागातील परिचारिका व डॉक्टरांसाठी मानक कार्यपद्धती तयार करून दिली आहे. महापालिका रुग्णालयांमधील कामाकाजात कोणतीही निष्काळजी खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.
महापालिका आरोग्य विभागाच्या सोमवारी (ता. ७) पार पडलेल्या नियमित आढावा बैठकीत आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला आणि विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले. पालिका क्षेत्रातील पाच महापालिका रुग्णालये आणि २९ खासगी रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवली जात आहे. यामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वाशी किंवा नेरूळ रुग्णालयात तत्काळ मदत कक्ष सुरू केला जाईल. तसेच आयुष्मान कार्डसाठी जिल्हास्तरावरून कार्ड उपलब्ध होण्याची वाट न पाहता महापालिकेच्या वतीने कार्ड बनवून त्यांचे वितरण जलद गतीने केले जाईल. महापालिका रुग्णालयांमधील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी सतर्क राहावे. प्रत्येक स्तरावरील कामाची आदर्श कार्यप्रणाली तयार करून त्यानुसारच काम करावे. रुग्णालय व्यवस्थापनात त्रुटी आढळल्यास किंवा निष्काळजी झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम कैलास शिंदे यांनी दिला.
या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दमयंती घाडगे व डॉ. रत्नप्रभा चव्हाण, सर्व रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, माता-बाल रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, विविध आरोग्य कार्यक्रमांचे वैद्यकीय अधिकारी आणि पीजी मेडिकल संस्थेचे डीन डॉ. ज्ञानेश बेलेकर उपस्थित होते.

क्षयरोगींच्या ट्रॅकिंगसाठी ‘एफडीए’ची मदत
शहरातील प्रत्येक क्षयरोगी महापालिकेच्या निगराणीखाली असावा यासाठी क्षयरोगाची औषधे घेणाऱ्या रुग्णांची माहिती सर्व औषध विक्रेत्यांकडून (केमिस्ट) संकलित केली जाणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मदतीने सर्व औषध विक्रेत्यांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डास उत्पत्ती रोखणे व गणेशोत्सवात आरोग्य जनजागृती
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी गणेशोत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी व मंडपांमध्ये एकत्र येतात, हे लक्षात घेऊन पालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती देणारे माहितीफलक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत.

३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अंतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग (स्तन, गर्भाशय, मुख), हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांची वेळेत तपासणी करून लवकर निदान करण्यासाठी अभियान अधिक गतिमान व अचूक राबवण्याचे आदेश देण्यात आले.

डेथ ऑडिटबाबतही सूचना
डेथ ऑडिट आणि रुग्णालयांसाठी एसओपी शहर क्षेत्रातील मृत्यूदराचा सविस्तर आढावा घेताना डेथ ऑडिट अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मृत्यूच्या कारणांची मीमांसा करून उपचारपद्धतीत सुधारणा करावी, जेणेकरून भविष्यातील मृत्यूदर कमी करता येईल. याशिवाय सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरणाचा अभ्यास करून अधिकाऱ्यांनी आपले अभिप्राय सादर करावेत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com