

राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ८ : नियम मोडा, ऑनलाइन चलान फाडून घ्या, मात्र दंड भरू नका, अशा ठाण्यातील काही मुजोर रिक्षाचालकांची बेफिकिरी आता वाहतूक व्यवस्थेलाच आव्हान ठरत आहे. गेल्या सात वर्षांत ठाणे शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत रिक्षाचालकांनी तब्बल ७८ कोटी २८ लाखांचा दंड थकवला आहे. थकीत दंडाच्या रकमेतून दुर्गम आदिवासी भागातील १०० हून अधिक शाळांचा कायापालट होऊ शकतो, एवढी मोठी ही रक्कम आहे. एकूण आठ लाख ९१ हजार २०२ चलनांमधून दंडाचा हा डोंगर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, एक लाखापेक्षा अधिक दंड थकीत असलेल्या ६१८ रिक्षाचालकांनीही अद्याप दंड भरलेला नाही, तर सहा लाखांहून अधिक दंड असलेल्या रिक्षाही रस्त्यावर धावत आहेत.
ठाणे वाहतूक शाखेच्या हद्दीत १८ उप-वाहतूक विभाग येतात. या हद्दीत एक लाखाहून अधिक अधिकृत रिक्षा धावतात. दिवसभरात १७ ते १८ लाख प्रवासी वर्ग या रिक्षांवर अवलंबून आहे. यातून रोज कोट्यवधींची उलाढाल होते. लाखो बेरोजगारांना रोजगार देणारा हा व्यवसाय आहे, मात्र काही बेशिस्त चालकांमुळे तो बदनाम झाला आहे. २०१९ ते २०२६ दरम्यान नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाकडून आठ लाख ९१ हजार २०२ वेळा ऑनलाईन चलान मारण्यात आले असून एकूण दंडाची रक्कम ७८ कोटी २८ लाख १५ हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे नियम पायदळी तुडवणाऱ्या या रिक्षा जप्त करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया सजग नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दोन रिक्षांवर सहा लाखांहून अधिकचा दंड
एका रिक्षावर तब्बल सहा लाख १३ हजार ४०० रुपयांचा दंड थकीत असून, दुसरीवर सहा लाख ११ हजार ४५० रुपये थकीत आहेत. तिसऱ्या रिक्षेवर पाच लाख ९८ हजार २०० रुपयांचा दंड थकीत आहे.
दंडाच्या वसुलीतून दोन नव्या रिक्षा
काही रिक्षांवरील थकीत दंडाची रक्कम पाहता त्या एकेका रिक्षाच्या दंडाच्या किंमतीत दोन ते तीन नव्या कोऱ्या रिक्षा खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे दंड थकवणाऱ्या या रिक्षा तत्काळ जप्त करून संबंधित चालक - मालकाचा रिक्षा चालवण्याचा परवाना आणि रिक्षा बॅच रद्द करायला हवा, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
अनेक दंड चुकीच्या पद्धतीने मारले गेले आहेत. रिक्षाचालकांचे पोट हातावर असल्याने रिक्षाच्या कर्जाचा हप्ते फेडायचे, घर चालवायचे, की दंड भरायचा? दंड भरायला सवलत द्यावी आणि दंडाची रक्कम निम्म्याने कमी करावी.
- संतोष पंडागळे, संस्थापक, समाता क्रांति सेना रिक्षा टॅक्सी युनियन
वाहतूक शाखेकडून ऑनलाइन दंडवसुली प्रक्रिया सुरू आहे. नाकाबंदी अथवा इतर वाहतूक नियमभंग प्रकरणात पकडण्यात आलेल्या वाहनांवरील ऑनलाइन दंडाची तपासणी करून तो वसूल केला जातो. कायदेशीर कारवाई करून काही प्रकरणे वसुलीसाठी न्यायालयातदेखील पाठवली जातात.
- पंकज शिरसाट, उपआयुक्त, वाहतूक, ठाणे शहर शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.