

उलव्यात रस्त्यांची दुरवस्था
सिडकोला निवेदन, गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीचे आश्वासन
उलवे, ता. ८ (बातमीदार) : उलवे सेक्टर २४, २५ आणि २५ अ परिसरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, फुटपाथवरील डेब्रिज आणि कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी तरघर गावचे माजी सरपंच धीरज ओवळेकर व स्थानिक नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
सेक्टर २४ मधील प्लॉट क्रमांक ५४९ ते सेक्टर २५ मधील प्लॉट क्रमांक १०१ पर्यंत आम्रमार्गाखालील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज, कचरा व घाण साचली आहे. आम्रमार्गावरून छोट्या दरडी कोसळण्याबरोबरच गवतही वाढले असून, गणेशोत्सवातील वाढत्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेक्टर २५ मधील गव्हाण फाटा-जावळे गाव मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महत्त्वाच्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती तसेच कायमस्वरूपी उपाय म्हणून काँक्रीटीकरणासाठी नवीन निविदा काढण्याची मागणी करण्यात आली.
सिडकोकडून दुरुस्तीचे आश्वासन
कार्यकारी अभियंता किरण चिखलेकर व सहाय्यक अभियंता योगेश गोसावी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पावसाळ्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण, तर सेक्टर २५ मधील तरघर ग्रामपंचायत समाजमंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आश्वासनाची अंमलबजावणी गरजेची
गणेशोत्सवात उलवे परिसरात नागरिक व भाविकांची मोठी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि फुटपाथवरील कचऱ्यामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी सिडकोने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. रस्ते दुरुस्ती, फुटपाथची स्वच्छता आणि धोकादायक ठिकाणांची पाहणी वेळेत झाली, तर गणेशोत्सव काळात नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ परिसर उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे सिडको प्रशासन या आश्वासनांची कितपत तत्परतेने अंमलबजावणी करते, याकडे उलवेकरांचे लक्ष लागले आहे.