

पारंपरिक भजनांचा सूर कायम
तरुणाईचा वाढता सहभाग; शंभर वर्षांची परंपरा आजही जिवंत
पोयनाड, ता. ८ (बातमीदार) : सोशल मीडिया, यूट्युब, इन्स्टाग्राम आणि डीजेच्या दणदणाटाचा प्रभाव वाढला असतानाही गणेशोत्सवातील पारंपरिक भजनांची परंपरा आजही ग्रामीण भागात कायम आहे. विशेष म्हणजे या भजनांकडे तरुणाईचा वाढता कल दिसून येत असून, गणेशोत्सवातील जागरण आणि भजनांमध्ये तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
रायगड जिल्ह्याला आध्यात्मिक व भक्तिमार्गाची समृद्ध परंपरा लाभली आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत विविध गावांतील भजनी मंडळांकडून पारंपरिक, शास्त्रीय व प्रासादिक भजने सादर केली जातात. मुंबई-पुण्यात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे चाकरमानीही गणेशोत्सवासाठी गावी परतल्यानंतर या भजनांमध्ये सहभागी होतात. संतांचे अभंग, गवळणी, गजर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांनी भजनरात्र रंगते.
पोयनाड परिसरातील विविध गावांमध्ये ग्रामस्थ, आळी, एकतारी, महिला, वारकरी तसेच मंदिर-देवस्थानांची भजनी मंडळे सक्रिय आहेत. पोयनाडपासून सांबरी, ताडवागळे, कोळघरपर्यंतच्या आदिवासी वाड्यांमधील महिलांचे पारंपरिक नृत्यही गणेशोत्सवाचे आकर्षण ठरते. शंभर वर्षांहून अधिक काळाची ही परंपरा नव्या पिढीच्या सहभागामुळे पुढे जात आहे.
चौकट :
नवनवीन गाण्यांचाही समावेश
समाजमाध्यमांवर लोकप्रिय होणाऱ्या नव्या चालींचे अभंग, गवळणी आणि भक्तिगीतेही आता भजनांमध्ये सादर केली जात आहेत. त्यामुळे पारंपरिक भजनांचा बाज कायम ठेवत नव्या पिढीच्या आवडीनिवडींचाही मेळ साधला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.