

पाणीप्रश्नी नगरसेवकांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईच्या विविध भागांत दूषित पाण्याचा पुरवठा, पाणीटंचाई आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी (ता. ८) पालिकेत उमटले. मालाड येथील प्रभाग समितीत नगरसेवकांनी ठिय्या मांडला.
पाणीटंचाई, अशुद्ध आणि अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने अनेक प्रभागातील नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेच्या मालाड येथील ‘पी-पूर्व’ आणि ‘पी-पश्चिम’ प्रभाग समिती बैठकीदरम्यान प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पाण्यासाठी प्रभाग क्रमांक ४३चे नगरसेवक अजित रावराणे यांनी हातात भांडे घेऊन महापालिका कार्यालयासमोर थेट जमिनीवर ठाण मांडले. तर, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी या आंदोलनाला आक्रमक पाठिंबा देत प्रशासनाचा निषेध केला. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी उपायुक्त (परिमंडळ ४) यांनी तातडीने एका शिष्टमंडळाला भेट देऊन प्रश्न निकाली काढावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली होती, मात्र ‘पाण्याचा प्रश्न हा जल अभियंता खात्याशी संबंधित आहे’ असे सांगत उपायुक्तांनी जबाबदारी झटकत प्रशासकीय अनास्था दाखविल्याने नगरसेवकांसह नागरिक संतप्त झाले. प्रशासनाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे मालाडमधील पाण्याचा प्रश्न आता कमालीचा गंभीर झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र छेडण्याचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.