वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा

वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा
Published on

मुंबई, ता. ९ : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, त्रुटीविरहित आणि परवडणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, ही सर्व संबंधितांची सामूहिक जबाबदारी असून, पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रकाशकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्यातील विविध प्रकाशन संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत संवाद साधला.

मंत्री भुसे म्हणाले, शैक्षणिक साहित्यामधील व्याकरण, इतिहास किंवा विषयवस्तूसंदर्भातील त्रुटी टाळण्यासाठी विषयतज्ज्ञ, व्याकरण आणि इतिहासाचे जाणकार यांच्या मार्गदर्शनाचा अधिक प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. एखाद्या प्रकाशनातील त्रुटीमुळे शासनाबाबत गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रकाशकांनी अधिक दक्षता घ्यावी. प्रत्येक शैक्षणिक साहित्य शास्त्रीय आणि तथ्याधिष्ठित असावे.

पालकांकडून विविध पुस्तकांच्या वाढत्या किमतींबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे नमूद करून मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची किंमत वाजवी ठेवण्यावर भर दिला. शाळा, संस्था आणि प्रकाशक यांनी समन्वयाने काम करून पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याचे मार्ग शोधावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-बुक, क्यूआर कोड, व्हिडिओ आधारित शिक्षणसाहित्य आणि सराव प्रश्नसंच यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर वाढत असताना विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत साहित्य विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

‘बुके नको, बुक द्या’ संकल्पना
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विभागाचा विचार आहे. ‘बुके नको, बुक द्या’ ही संकल्पना व्यापक लोकचळवळ बनविण्याची गरज असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले. शाळांमध्ये लघु वाचनालये, पुस्तक महोत्सव, वाचन स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावता येईल. याबाबत विभागाने सकारात्मक पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com