

कुकरच्या स्फोटात दोन मुले, महिला भाजली
सोपाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेतील घटना; एका विद्यार्थी गंभीर
नालासोपारा, ता. ८ (बातमीदार) : सोपारा गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवित असताना कुकरचा अचानक स्फोट झाल्याने दोन विद्यार्थी आणि स्वयंपाक करणारी महिला भाजल्याची घटना मंगळवारी (ता. ८) दुपारी २च्या सुमारास घडली. या घटनेत तिसरीतील आयुष चौधरी आणि पाचवीतील प्रसाद गौतम हे विद्यार्थी जखमी झाले असून, आयुषचा चेहरा गंभीर भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दुपारच्या जेवणासाठी शाळेत खिचडी शिजविण्याचे काम सुरू होते. त्या वेळी दाराजवळ असलेल्या कुकरचा अचानक स्फोट झाला. कुकरमधील उकळती खिचडी विद्यार्थ्यांच्या अंगावर आणि चेहऱ्यावर उडाल्याने दोन्ही मुले तसेच स्वयंपाक करणारी महिला भाजली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच महापौर आजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, माजी महापौर नारायण मानकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वयंपाक सुरू असताना कुकरचा स्फोट झाल्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वयंपाकाची व्यवस्था, विद्यार्थ्यांपासून स्वयंपाकघराचे अंतर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.