कूपर-ट्रॉमातील मनुष्यबळाची अडचण सुटणार

कूपर-ट्रॉमातील मनुष्यबळाची अडचण सुटणार
Published on

कूपर-ट्रॉमातील मनुष्यबळाची अडचण सुटणार
७९० पदांची भरती; नवीन सेवांसह रुग्णालयांच्या सक्षमीकरणावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या लवकरच दूर होणार आहे. या दोन्ही रुग्णालयांतील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ७९० अतिरिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.
खासदार रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात मंगळवारी (ता. ८) विशेष बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त शरद उघडे, संचालक डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्षीरसागर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, रुग्णालय प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत कूपर व ट्रॉमा रुग्णालयांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, मनुष्यबळाची कमतरता आणि रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या नवीन सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
२०१३ पासून आरोग्य विभागाने रुग्णालयांतील पदभरतीचा आकृतिबंध तयार केला नव्हता. त्यामुळे डॉक्टरांसह विविध पदे रिक्त राहिली असून, त्याचा ताण रुग्णसेवा व उपलब्ध सुविधांवर पडत होता. ही समस्या दूर करण्यासाठी आता नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला असून, कूपर आणि ट्रॉमा रुग्णालयांसाठी ७९० अतिरिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. दरम्यान, नागरिकांना कमी दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जनरिक मेडिसिन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कूपर रुग्णालयातील या सुविधेचे काम पूर्ण झाले असून, ट्रॉमा रुग्णालयातही लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे.

फिजिओथेरपी विभाग
ट्रॉमा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सुरू करण्यासह बालरुग्णांवरील शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच नवजात शिशु तीव्र काळजी विभागाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. सध्या ट्रॉमा रुग्णालयात केवळ १० आयसीयू बेड आहेत. ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याची सूचना खासदार वायकर यांनी केली असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

विशेष देखरेख समिती
ओशिवरा येथील १५० खाटांच्या प्रसूतिगृहाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच स्कॉट्स कॉलनी येथील प्रसूतिगृहाच्या आराखड्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ११ सदस्यांची विशेष देखरेख समिती स्थापन करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com