

मुंबई, ता. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि या वास्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी व्हावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (ता. ९) दिले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटींच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहाचे जतन व संवर्धनाच्या कामांचा व प्रशासकीय मान्यतेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव ना. बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहसचिव पु. प्र. साबणे, वित्त विभागाच्या अवर सचिव शि. भा. भोगटे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे व चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर करावी. सर्व संबंधित विभाग आणि संस्थांनी समन्वयातून जतन व संवर्धनाची कामे करावीत, अशा सूचनाही त्यानी दिल्या. नियोजित कामांचा सद्य:स्थिती अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे हा ऐतिहासिक वारसा आहे. या वास्तूंच्या संवर्धनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सदैव प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहील.
- अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा
मुंबई : शैक्षणिक संस्थांच्या कामाचा अण्णा बनसाेडे यांनी बैठकीत आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.