

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने पर्यावरण संवर्धन, वायुप्रदूषण नियंत्रण, स्वच्छता व्यवस्थापन आणि महसूलवाढीसाठी व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. बांधकामस्थळांवरील धूळ प्रदूषणाला आळा घालण्यापासून घोडबंदर रोडवरील मेट्रोचा राडारोडा हटविणे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, मालमत्ता कर वसुलीला गती देणे आणि हरित क्षेत्र वाढविण्यापर्यंत विविध उपाययोजनांचा यात समावेश आहे. या सर्व कामांची जबाबदारी निश्चित करून ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले.
नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, उपनगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापली कामे वेळेत पूर्ण करावीत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बांधकामस्थळांवरील धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश पर्यावरण विभागाला देण्यात आले. वाहनांच्या चाकांवरील माती आणि चिखल रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रत्येक बांधकामस्थळी टायर वॉशिंगची सुविधा सुरू ठेवणे बंधनकारक आहे. नियमित पाणी फवारणी, हिरव्या जाळ्यांचा वापर आणि पर्यावरणीय नियमांचे पालन होते की नाही, याची सातत्याने तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामातून निर्माण होणारा राडारोडा आणि वापरात नसलेली यंत्रसामग्री रस्त्यालगत पडून राहू नये, यासाठी संबंधित मेट्रो प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. खासगी बांधकामांचा राडारोडा रस्त्यावर आढळल्यास संबंधित विकसकाला नोटीस देऊन नियमांनुसार दंड वसूल केला जाणार आहे.
घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढणार
बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या. प्रभागांमध्ये घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी नियोजन करण्याचेही आदेश देण्यात आले.
खुल्या जागा, हरित क्षेत्राचे संरक्षण
वृक्ष प्राधिकरण, उद्यान आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे काम करून वृक्षसंवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि उपलब्ध खुल्या जागांचे संरक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाढत्या शहरीकरणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नव्या हरित क्षेत्रांच्या निर्मितीचे दीर्घकालीन नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सणांसाठी स्वतंत्र नियोजन
गणेशोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा संकलन, ध्वनी आणि वायुप्रदूषण नियंत्रणावर भर देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार फांद्या छाटणीसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
महसूलवाढीसाठी सर्व स्रोतांचा शोध
महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.