विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी विक्रमगडची बाजारपेठ सजली

विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी विक्रमगडची बाजारपेठ सजली
Published on

विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी विक्रमगडची बाजारपेठ सजली
विविधरंगी गणेशमूर्तींसह सजावटीच्या साहित्याची रेलचेल, आगमनाचे वेध

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्रमगड शहरासह तालुक्यात गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्येही लगबग वाढली आहे. गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेशोत्सव म्हटला की सजावटीला विशेष महत्त्व असते. यंदा पर्यावरणपूरक मखरांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आकर्षक हार व सजावटीच्या साहित्याची मागणी
फुलांच्या वाढत्या दरामुळे आता भाविक पर्याय म्हणून मोत्यांच्या कंठ्या व कृत्रिम फुलांच्या हारांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. गणेशमूर्तीच्या सजावटीसोबतच आकर्षक विद्युत रोषणाई, पडदे, फुलांच्या माळा, तोरणे, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य यांचीही दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. हाताने कोरीव काम केलेल्या मखरांच्या सजावटीला यंदा विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या विविध पूजा साहित्याच्या खरेदीसाठीही गणेशभक्तांनी विक्रमगडच्या बाजारपेठेकडे मोर्चा वळविला आहे. गणेशोत्सवाच्या काळात फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरातही वाढ होत असते. त्यामुळे भाविक कृत्रिम फुलांच्या हाराचा वापर सजावटीसाठी करण्याला प्राधान्य देत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केवळ बाजारपेठेतच नव्हे तर ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. भजनी मंडळांच्या तालमींनाही वेग आल्यामुळे पारंपरिक वाद्यांची डागडुजी करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत विक्रमगडची बाजारपेठ गणेशोत्सवाच्या काळात आणखी गजबजणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com