स्वराज्य’ भवनाचा खर्च ३७१ कोटींवर!

स्वराज्य’ भवनाचा खर्च ३७१ कोटींवर!
Published on

३७१ कोटींचे स्वराज्य भवन
सुधारित खर्चाला विशेष सभेची मंजुरी; टप्पा १ साठी १२० कोटी, अंतर्गत सजावटीसाठी २५१ कोटी
पनवेल, ता. ९ (बातमीदार) ः पालिकेच्या नवीन प्रशासकीय मुख्यालय स्वराज्य भवनचा खर्च आता तब्बल ३७१ कोटी ६९ लाख रुपयांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मूळ अंदाजपत्रकात २०० कोटींची तरतूद असताना १७१.६९ कोटींनी खर्च अधिक झाल्याने आर्थिक नियोजनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासकीय इमारतीच्या टप्पा १ आणि टप्पा २ मधील कामांसाठी हा खर्च मंजूर केला आहे. टप्पा १ साठी १२० कोटी १३ लाख ६५ हजार ५९४ रुपये इतका ढोबळ अंदाजित खर्च मंजूर करण्यात आला आहे. या रकमेत वस्तू व सेवा कर तसेच आनुषंगिक तरतुदींचा समावेश आहे. महापालिकेच्या प्रस्तावानुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान वास्तुविशारद, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि महापालिकेच्या तांत्रिक आढाव्यात इमारतीचा दीर्घकालीन टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, देखभाल सुलभता, वास्तुशिल्पीय गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी काही अतिरिक्त वास्तुशिल्पीय बाबींची आवश्यकता असल्याचे दाखवण्यात आले. तर टप्पा २ मध्ये मुख्यालयाच्या अंतर्गत सजावट आणि इतर आनुषंगिक कामांसाठी २५१ कोटी ५५ लाख ५८ हजार ९३१ रुपये इतका सुधारित खर्च मंजूर केला आहे. अंतर्गत सजावटीवर अधिक तरतूद असल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

खर्च आणखी वाढण्याची शक्यता!
या प्रस्तावातील आणखी एक बाब विशेष लक्षवेधी आहे. विस्तृत अंदाजपत्रक तयार करून त्याला तांत्रिक मंजुरी देताना किमतीमध्ये १० ते १५ टक्क्यांपर्यंत फरक पडू शकतो, असे प्रशासनाने नमूद केले आहे. म्हणजेच ३७१.६९ कोटी रुपये हीच अंतिम मर्यादा असेल, असे सध्या निश्चितपणे म्हणता येत नाही. १० टक्के वाढ गृहीत धरल्यास हा खर्च सुमारे ४०८.८६ कोटी रुपये होऊ शकतो, तर १५ टक्के वाढ झाल्यास तो सुमारे ४२७.४५ कोटींपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मंजूर झालेला ३७१ कोटींचा खर्च प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत आणखी किती वाढतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com