

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये गौरव
कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्कार प्रदान
लंडन, ता. ९ : ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाउस ऑफ लॉर्डसध्ये बुधवारी (ता. ९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. या वेळी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार - जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करून एकनाथ शिंदे यांनी भाषेचा अभिमान व्यक्त केला. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने हाउस ऑफ लॉर्डस् येथे पार पडलेल्या या सोहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नावीन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान त्यांना देण्यात आला. विशेषत: त्यांच्या काळातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम या प्रमुख योजना राबविण्यासाठी त्यांना गौरविण्यात येत असल्याचे त्यांच्या मानपत्रात नमुद करण्यात आले. भारत-ब्रिटन संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करीत असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेची शक्ती असल्याचे ते म्हणाले. ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हे भारत-ब्रिटन संबंधातील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे आपल्या भाषणात सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा, त्यांच्या आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव असल्याचे स्पष्ट केले.
आई, पत्नीच्या कष्टांनी शिकविले!
माझ्या आयुष्याची सुरुवात अगदी लहान अशा शेतकरी कुटुंबात झाली. मी कुठल्याही मोठ्या सुखवस्तू घराण्यात जन्माला आलो नाही. माझी आई आणि पत्नी यांना मी दिवसरात्र कुठलीही तक्रार न करता काबाडकष्ट करताना पाहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू मला माहिती आहेत. या अनुभवातूनच मी शिकलो, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले, की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा त्यांनी भाषणात विशेष उल्लेख केला. मला माझी एक बहीण आहे; पण लाडकी बहीण योजनेमुळे करोडो बहिणी मला मिळाल्या आहेत, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा गजर झाला.