स्मार्ट मीटरविरोधात चारोटी नाक्यावर महामार्ग रोखला

स्मार्ट मीटरविरोधात चारोटी नाक्यावर महामार्ग रोखला
Published on

स्मार्ट मीटरविरोधात महामार्ग रोखला
चारोटी नाक्यावर अडीच तास वाहतूक ठप्प
कासा, ता. १० (बातमीदार) ः स्मार्ट मीटरची सक्ती आणि अवाजवी वीजबिलांच्या निषेधार्थ भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे गुरुवारी (ता. १०) राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. जव्हार, शहापूर, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू यांसह पालघर जिल्ह्याच्या विविध भागांतून नागरिक, शेतकरी, कामगार, महिला, युवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. भरपावसातही आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडून सरकार व महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“एमएसईबीची दादागिरी चालणार नाही, हुकूमशाही चालणार नाही, इन्कलाब जिंदाबाद,” अशा घोषणांनी चारोटी परिसर दणाणून गेला. सुमारे अडीच तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे मुंबई आणि गुजरातच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, मात्र रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांची वाहने जाण्यासाठी आंदोलकांनी मार्ग मोकळा ठेवला होता. ग्राहकांना विश्वासात न घेता जुने वीजमीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जुने मीटर पूर्ववत बसवावेत, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आणि स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वादग्रस्त वीजबिलांची तपासणी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले यांनी केले.

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
महावितरणचे डहाणू उपविभागीय अभियंता गणेश दंडगव्हाळ यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली. स्मार्ट मीटरधारकांना जुन्या मीटरच्या पद्धतीप्रमाणे बिल आकारणी करण्यात येईल. कोणत्याही ग्राहकावर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आश्वासनानंतर आमदार निकोले यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
----
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलनाची पुढची दिशा अधिक तीव्र असेल. रस्ता रोको हा आमचा लोकशाही हक्क आहे. वेळ पडली तर रेल्वे रोकोही करू. अटक झाली तरी आम्ही मागे हटणार नाही.
- आमदार विनोद निकोले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com