विमानतळाच्या दिशादर्शक फलकांवरून टोलवाटोलवी

विमानतळाच्या दिशादर्शक फलकांवरून टोलवाटोलवी
Published on

विमानतळाच्या दिशादर्शक फलकांवरून टोलवाटोलवी
वंदना गुप्तेंच्या व्हिडिओनंतर विमानतळ प्रशासनाकडून सिडको, एमएमआरडीएकडे बोट

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवरील दिशादर्शक फलकांच्या अभावाबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी व्हिडिओद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर आता संबंधित प्रशासकीय यंत्रणांमधील असमन्वय आणि जबाबदारी झटकण्याची वृत्ती उघड झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विषयावर विमानतळ प्रशासनाने आपली हद्द दाखवत थेट सिडको, एमएमआरडीए आणि महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, विमानतळाच्या १,१६० हेक्टर आवारातील आणि स्वतःच्या नियंत्रणाखालील रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांची जबाबदारी त्यांची आहे; मात्र विमानतळाच्या हद्दीबाहेर आणि मुख्य प्रवेशमार्गांवर फलक लावणे हे त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत त्यांनी हात वर केले आहेत. या मार्गांवरील फलकांची जबाबदारी सिडको, एमएमआरडीए, स्थानिक महापालिका, तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरणाची असल्याचे सांगत विमानतळ व्यवस्थापनाने सर्व जबाबदारी दुसऱ्या प्राधिकरणांवर ढकलली आहे. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी व्हिडिओद्वारे मांडलेली समस्या ही दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची वस्तुस्थिती आहे. असे असतानाही, विमानतळ सुरू होण्यापूर्वी सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन हे प्राथमिक नियोजन करणे गरजेचे होते; परंतु प्रत्यक्षात मात्र ‘माझी हद्द - तुझी हद्द’ असा टोलवाटोलवीचा खेळ सुरू आहे.
------------------------------------------
सिडको आणि एमएमआरडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई परिसराचा पायाभूत विकास आणि रस्ते जाळ्याची जबाबदारी सिडको आणि एमएमआरडीकडे आहे. विमानतळाला जोडणाऱ्या प्रमुख जोडमार्गांवर योग्य दिशादर्शकांचे जाळे का उभारण्यात आले नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या यंत्रणांनी तत्काळ एकत्र येऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com