

पनवेल ता. ११ (बातमीदार) : अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे विद्यालय संचलित ‘पंचकोशाधारित गुरुकुल’ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी तळोजा येथील ‘सकाळ’च्या प्रिंटिंग प्रेसला बुधवारी (ता. ९) भेट देत वृत्तपत्र निर्मिती आणि छपाई प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
गुरुकुलप्रमुख आश्वनी करजगी, व्यवस्थापक विवेक पाटील, शिक्षिका विजया पाटील व मधुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्र भेट झाली. विद्यार्थ्यांना दैनिकाचे तांत्रिक तसेच छापील कामकाज प्रत्यक्ष समजावे, या उद्देशाने ही एकदिवसीय शैक्षणिक सहल काढली होती. ‘सकाळ’ प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना वृत्तपत्राच्या छपाई प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने विविध प्रश्न विचारले. कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी सीटीपी विभागाचे चिंचाळकर आणि रंग विभागाचे रमेश गवळी यांनी विद्यार्थ्यांना मुद्रण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदाचा वापर, रंगसंगती, छपाईचे तंत्र, विविध यंत्रणांचे कार्य, देखभाल व दुरुस्ती आदींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वृत्तपत्राची छपाई सुरू झाल्यापासून ते तयार अंक वाचकांच्या हातात पोहोचेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. वितरण विभागातील सुरेश ठाकूर यांनी वर्तमानपत्र विविध ठिकाणी पोहोचवण्याची पद्धत, वितरण यंत्रणा तसेच ‘सकाळ एनआयई’ अंक व त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
वृत्तपत्रांची उद्दिष्ट
वृत्तपत्रांमध्ये ताज्या घडामोडींच्या वार्तांसह मते, जाहिराती, रंजक व पूरक मजकुराचा समावेश असतो. समाजप्रबोधन, जनमत घडविणे, शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे, उद्योग-व्यवसायाला जाहिरातींच्या माध्यमातून चालना देणे तसेच स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणे, अशी वृत्तपत्रांची विविध उद्दिष्टे असल्याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली
दैनिकाचे तांत्रिक तसेच छापील कामकाज कशाप्रकारे चालते, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळावी, या हेतूने ही शैक्षणिक सहल काढली होती. प्रेस पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. या भेटीमुळे विद्यार्थ्यांसह आमच्या ज्ञानातही भर पडली. त्याबद्दल ‘सकाळ’ समूहाचे मनःपूर्वक आभार.
- विवेक पाटील, वर्गशिक्षक
अंबरनाथ : गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तळोजा येथील सकाळ प्रिंटिंग प्रेसला भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.