

भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : गणेशोत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून, ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसह डीजे चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिला. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा गौरव सोहळा बुधवारी अंजुरफाटा येथील ओसवाल महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास भिवंडी महापालिकेचे महापौर नारायण चौधरी, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले, महापालिका आयुक्त अनमोल सागर, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई, भिवंडी पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्यासह शांतता समितीचे सदस्य आणि गणेशभक्त उपस्थित होते. गणेशोत्सवात उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच डीजे चालकांचे साहित्य जप्त करून अटकेची कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी आणि गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन दुधे यांनी केले.
धामणकर नाका मित्र मंडळ प्रथम
शहरातील पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळांसाठी झालेल्या स्पर्धेत मागील वर्षी ४३ सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यात धामणकर नाका मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत फिरती ढाल आणि प्रथम पारितोषिक मिळविले. मंडळाचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक राजेश शेट्टी आणि पदाधिकाऱ्यांनी अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारले. द्वितीय क्रमांक संयुक्त मित्र मंडळ, गौरीपाडा आणि श्री गणेश मित्र मंडळ यांनी संयुक्तपणे मिळविला. तृतीय क्रमांक स्व. पंडित नाना मित्र मंडळ, चंदनबाग आणि स्वामी समर्थ सेवा समिती गणेशोत्सव मंडळाने पटकावला. खोणी येथील युवा मित्र मंडळाला विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात आले. तसेच पोलिस ठाणेनिहाय विविध गणेशोत्सव मंडळांचाही गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.