

घराच्या परिसरातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी
पनवेल महापालिकेच्या वतीने ४३ ठिकाणी आरोग्य शिबिरे; फणसवाडीत शिबिराचे उद्घाटन
पनवेल ता. ११ (बातमीदार) : नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पनवेल पालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याणकारी योजनेअंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये सुमारे ४३ ठिकाणी ही शिबिरे घेण्यात येणार असून, १० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महापौर नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातील शिबिराचे उद्घाटन फणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभाग समिती बचे सभापती मधू पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरांमध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, कान-नाक-घसा, भिषक, नेत्ररोग, अस्थिरोग, मानसोपचार, बालरोग आणि त्वचारोग या विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचार व वैद्यकीय सल्लाही देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावी, हा या आरोग्य शिबिरांचा प्रमुख उद्देश आहे. विविध आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे गांभीर्य वाढण्यापूर्वीच त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका