

बदलापूर, ता. ११ (बातमीदार) : वांगणी परिसरातील दृष्टिबाधित व्यक्तींना रोजगार, कौशल्य विकास, पुनर्वसन आणि सामाजिक सहाय्याच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल इम्पेयर्ड पर्सन्स (एनएफओव्हीआयपी) संस्थेला अखेर कायमस्वरूपी केंद्र मिळाले आहे. ‘प्रचेस्टा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या पुढाकारातून आणि सोलर टर्बाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक दायित्व निधीतून हे केंद्र साकारण्यात आले आहे.
सध्या वांगणी परिसरातील २००हून अधिक दृष्टिबाधित कुटुंबांना किराणा साहित्य, वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आपत्कालीन मदत, रुग्णवाहिका सेवा तसेच विविध उपजीविका आणि कल्याणकारी योजनांचा आधार दिला जात आहे. मात्र, संस्थेकडे कायमस्वरूपी कार्यस्थळ नसल्याने दर दोन-तीन वर्षांनी कार्यालय आणि कार्यस्थळ बदलावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी कायमस्वरूपी केंद्राची मागणी होती. यासाठी ‘प्रचेस्टा चॅरिटेबल ट्रस्ट’सह विविध स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सोलर टर्बाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक दायित्व निधीतून प्रचेस्टा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने एनएफओव्हीआयपीसाठी इमारत उपलब्ध करून तिचे नूतनीकरण केले. या नवीन केंद्राचे ५ सप्टेंबरला सोलर टर्बाइन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे भारतातील प्रमुख अनुप हणमंते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या केंद्रामुळे दृष्टिबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगार, कौशल्यविकास, सुरक्षितता आणि स्वयंरोजगाराच्या संधींसाठी कायमस्वरूपी आधार मिळणार आहे. या वेळी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी सब्यसाची मुखर्जी, ट्रस्टचे अध्यक्ष कल्याण चक्रवर्ती, खजिनदार प्रत्युष चट्टोपाध्याय यांच्यासह प्रसाद परब, किशोर शेलार, रामदास खोत, देवभा पवार, प्रदीप व प्रीती कुलकर्णी, मनोज कटारिया, ताई पाटील, नितीन कांबळे, एनएफओव्हीआयपीचे अध्यक्ष प्रजेश कालिदासन, खजिनदार अभिमन्यू पवार, सचिव ज्ञानेश्वर जरारे, सहसचिव सुषमा माने, सल्लागार लता पाटील उपस्थित होते.
अनेकांना प्रशिक्षण
२०१० मध्ये स्थापन झालेल्या एनएफओव्हीआयपीच्या माध्यमातून अगरबत्ती, धूप, स्क्रबर, मॉप, वायर बॅग, वायर बास्केट आदी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून २० ते २५ दृष्टिबाधित कुटुंबांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दृष्टिबाधित थेरपिस्टमार्फत मसाज केंद्र; तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या दृष्टिबाधित पुरुषांसाठी वसतिगृहही सुरू करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.