सर्वायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान पालघरमध्ये

सर्वायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान पालघरमध्ये
Published on

‘सर्व्हायकल कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियानात आता पालघर जिल्ह्याचाही समावेश; शालेय मुलींच्या मोफत लसीकरणासाठी प्रशासनाची ‘जीविका’सोबत भागीदारी

पालघर, ता. ११ (बातमीदार) : महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार वेगाने सुरू आहे. पुणे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा जिल्ह्यांनंतर आता पालघर जिल्ह्याचाही या राज्यव्यापी अभियानात अधिकृत समावेश करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्याचा ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र’ अभियानात समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील नऊ ते १५ वयोगटातील पात्र मुलींना मोफत ‘एचपीव्ही’ लसीकरण करण्यात येणार आहे. सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये जनजागृती, लसीकरण व वैद्यकीय देखरेखीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जीविका फाउंडेशन पार पाडणार आहे. या उपक्रमामुळे किशोरवयीन मुलींचे भविष्यातील आरोग्य सुरक्षित करण्यास मोठी मदत होणार आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी पालघर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांमधील किशोरवयीन मुलींना मोफत ‘एचपीव्ही’ लसीकरण आणि व्यापक जनजागृती मोहिमेसाठी प्रशासनाने ‘जीविका फाउंडेशन’सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली असून, जिल्ह्यात लवकरच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. दर आठ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत असून, दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आह; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वेळेवर तपासणी आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो. पालघर जिल्ह्यातील या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत, नऊ ते १३ वयोगटातील मुलींना कॉर्पोरेट ‘सीएसआर’च्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. तसेच, १४ ते १५ वयोगटातील पात्र मुलींना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोफत ‘गार्डासिल-४’ लस दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांचा समावेश असेल. या राज्यव्यापी मोहिमेला गती देण्यासाठी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जीविका फाउंडेशनचे चेअरमन जिग्नेश पटेल यांच्यासोबतची ही ऐतिहासिक भागीदारी अधिकृतपणे निश्चित केली आहे.


महाराष्ट्र शासनासोबत या अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य अभियानाचा भाग होण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पालघर जिल्हा प्रशासनासोबतची ही भागीदारी या मोहिमेसाठी एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक पात्र मुलीपर्यंत सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
- जिग्नेश पटेल, व्यवस्थापक, चेअरमन, जीविका फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com