

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : घरोघरी गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून काही तासांचाच कालावधी शिल्लक आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा तब्बल एक लाख ८२ हजार ६१४ गणेशमूर्ती आणि गौरींची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. यामध्ये एक लाख ६५ हजार ४४८ घरगुती, तर एक हजार ७६ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि १६ हजार ९० गौरींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस ठाणे जिल्हा अक्षरशः गणेशमय होणार आहे.
गणरायाचे सोमवारी (ता. १४) आगमन होणार असून, दुसऱ्या दिवसापासूनच विसर्जनाच्या मिरवणुकींना सुरुवात होईल. परिमंडळनिहाय आकडेवारी पाहता कल्याण परिमंडळात सर्वाधिक ६० हजार ६६ गणेशमूर्ती व गौरींची स्थापना अपेक्षित आहे. त्यानंतर उल्हासनगर परिमंडळात ५४ हजार २०९, वागळे इस्टेटमध्ये ३४ हजार २२७, ठाणे परिमंडळात १७ हजार २४८ आणि भिवंडी परिमंडळात १६ हजार ८६४ मूर्तींची नोंद आहे.
कल्याणमध्ये सार्वजनिक मूर्तींची संख्या ३०२ असून घरगुती गणपती ५२ हजार ५४४ आहेत. ठाणे परिमंडळात १२८ सार्वजनिक आणि १५ हजार ३५२ घरगुती गणपती, तर वागळे इस्टेटमध्ये २०२ सार्वजनिक आणि ३२ हजार ३२६ घरगुती गणपतींची नोंद झाली आहे.
अनंत चतुर्दशीला ‘गर्दीचा कळस’
विसर्जनाच्या सर्व दिवसांमध्ये २५ सप्टेंबरचा दिवस सर्वाधिक धामधुमीचा ठरणार आहे. अनंत चतुर्दशीला तब्बल ७९६ सार्वजनिक आणि ४० हजार २६७ घरगुती मूर्तींचे विसर्जन अपेक्षित आहे. त्याआधी १५ सप्टेंबरला दीड दिवसाच्या ४४ हजार १४६ गणपतींचे, तर १९ सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीसह ४० हजार ९४१ घरगुती गणपती आणि १६ हजार ९० गौरींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवसांनाही विसर्जन घाटांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कल्याणमध्ये सर्वाधिक विसर्जनस्थळे
विसर्जनाची गर्दी विभागण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात तब्बल १९३ विसर्जनस्थळे निश्चित केली आहेत. यामध्ये कल्याण परिमंडळात सर्वाधिक ५६, उल्हासनगरमध्ये ४३, भिवंडीत ३९, ठाण्यात ३८ आणि वागळे इस्टेट परिमंडळात १७ विसर्जनस्थळे आहेत. गणेशमूर्ती संकलनासाठी ६६ कलेक्शन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याणमध्ये २६, वागळे इस्टेटमध्ये १३, उल्हासनगरमध्ये १२, भिवंडीत १० आणि ठाण्यात पाच केंद्रांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाची आकडेवारी
तपशील संख्या
सार्वजनिक मूर्ती १,०७६
घरगुती गणपती १,६५,४४८
गौरी १६,०९०
एकूण १,८२,६१४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.