वांद्र्यात साकारतेय सोमनाथ मंदिराची प्रतिकृती

वांद्र्यात साकारतेय सोमनाथ मंदिराची प्रतिकृती
Published on

वांद्र्यात साकारतेय सोमनाथ मंदिराची प्रतिकृती
वांद्रे पश्चिम मंडळातर्फे ऐतिहासिक देवस्थानांची आरास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध देवस्थानांची ओळख मुंबईकरांना करून देणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. गणेशोत्सवाच्या आरासीतून भारतीय धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य परंपरेची माहिती देण्याचा मंडळाचा उपक्रम यंदाही कायम राहणार आहे.
मंडळाचे संस्थापक व सल्लागार तथा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून ही आरास साकारण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान भाविकांना या प्रतिकृतीचे दर्शन घेता येणार आहे.
मंदिराची रचना, शिखर, सभामंडप, कोरीवकाम आणि परिसराचा बारकाईने अभ्यास करून गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्याची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुजरातला न जाता सोमनाथ मंदिराच्या स्थापत्यशैलीची अनुभूती घेता येणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीसोबत करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाईही यंदाच्या आरासीत विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली. या आरासीतून केवळ धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्याऐवजी त्यांचा इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मंडळाच्या उपक्रमाला दरवर्षी भाविक आणि मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

स्थापत्यवैभवाची हुबेहूब अनुभूती
गुजरातमधील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. मंदिराचा प्रदीर्घ इतिहास, अनेकदा झालेले पुनर्निर्माण आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य यामुळे सोमनाथला भारतीय सांस्कृतिक वारशात विशेष स्थान आहे.

प्रसिद्ध मंदिरांच्या आरासीतून सांस्कृतिक दर्शन-
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या काही वर्षांत विविध प्रसिद्ध देवस्थानांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा जपली आहे. यापूर्वी शिर्डीचे साई मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केदारनाथ मंदिर आणि गोव्यातील श्री शांतादुर्गा मंदिर यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या.

धार्मिक पर्यटनाचा संदेश
यंदाच्या सोमनाथ मंदिराच्या आरासीतून मंदिराचा इतिहास, भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि स्थापत्यवैभव यांची माहिती देण्यात येणार आहे. धार्मिक स्थळांकडे केवळ श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता त्यामागील इतिहास, कला आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com